
स्थैर्य, फलटण, दि. 15 ऑक्टोबर : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. साखरवाडी जिल्हा परिषद गटात अनुसूचित जातीचे आरक्षण जाहीर झाल्याने या भागातील एक प्रमुख राजकीय व्यक्तिमत्व असलेले विक्रमसिंह भोसले यांना निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर रहावे लागणार आहे. मात्र, याच साखरवाडी गणातील पंचायत समितीची जागा इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिलेसाठी आरक्षित झाल्याने, आता त्यांच्या कन्या शिवांजली भोसले यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
फलटण तालुक्याच्या राजकारणात विक्रमसिंह भोसले हे एक आक्रमक, अभ्यासू आणि विकासाभिमुख नेते म्हणून परिचित आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांचे नाव आघाडीवर असताना आरक्षणाच्या बदलामुळे त्यांना थांबावे लागले आहे. मात्र, राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी ते आपली उच्चशिक्षित कन्या शिवांजली यांना संधी देणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे साखरवाडीच्या राजकारणात एका नव्या पिढीच्या नेतृत्वाची चाहूल लागली आहे.
शिवांजली भोसले यांच्या संभाव्य उमेदवारीला केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर वरिष्ठ राजकीय वर्तुळातूनही पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. भोसले कुटुंबाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी असलेले निकटचे संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे शिवांजली यांच्या उमेदवारीला खासदार गटाकडून हिरवा कंदील मिळाल्यास त्यांची दावेदारी अधिक मजबूत होऊ शकते.
सध्या साखरवाडी गावातील कट्ट्या-कट्ट्यावर आणि राजकीय वर्तुळात केवळ एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे शिवांजली विक्रमसिंह भोसले. “काम करणारे हात थांबले तरी विचार पुढे जातात,” अशा भावना व्यक्त करत ग्रामस्थ आता भोसले यांच्या दुसऱ्या पिढीकडून नव्या ऊर्जेची आणि विकासाची अपेक्षा करत आहेत. तरुण आणि सुशिक्षित नेतृत्व गावाच्या विकासाला नवी दिशा देईल, असा विश्वास अनेकांना वाटत आहे.
या सर्व घडामोडींमुळे साखरवाडी गणातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत. विक्रमसिंह भोसले यांनी आपल्या राजकीय अनुभवाच्या जोरावर अनेक वर्षे या भागाचे नेतृत्व केले आहे. आता त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शिवांजली भोसले राजकारणात सक्रिय होणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
भोसले कुटुंब यावर काय निर्णय घेणार आणि शिवांजली भोसले खरोखरच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र, त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने साखरवाडी गणातील पंचायत समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि लक्षवेधी ठरणार, हे निश्चित आहे.