![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2025/02/satyajeetraje_naik_nimbalkar_phaltan.jpg?resize=780%2C470&ssl=1)
दैनिक स्थैर्य | दि. ११ फेब्रुवारी २०२५ | फलटण | सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व त्यांच्या गोविंद मिल्क प्रकल्पावर तब्ब्ल ५ दिवस केंद्रीय आयकर विभागाच्या माध्यमातून कसून चौकशी सुरू होती. या चौकशीमध्ये आयकर विभागाचे अधिकारी विविध ठिकाणी छापे टाकून आर्थिक व्यवहारांची तपासणी करीत होते.
बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता आयकर विभागाचे अधिकारी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व त्यांचे चुलत बंधू श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या सातारा, पुणे आणि फलटण येथील निवासस्थानी छापे टाकले. यावेळी गोविंद मिल्क डेअरी प्रकल्पावरही तपासणी करण्यात आली होती. ही चौकशी तब्बल ५ दिवस चालली होती, परंतु या काळात कोणतेही निष्पन्न झालेले नाही.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करणार होते, असे चर्चा होत्या. या पार्श्वभूमीवर आयकर विभागाची ही कारवाई राजकीय आकसापोटी केली गेल्याचा आरोप त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक करत आहेत. फलटणचे माजी आमदार दीपक चव्हाण यांनीही आयकर विभागाच्या कारवाईचा निषेध केला आहे.
गोविंद मिल्कचे संचालक श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, जे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव आहेत, त्यांनी कठीण काळामध्ये साथ दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानत WhatsApp स्टेटसद्वारे संदेश दिला आहे. त्यांनी “#दूध का दूध और पानी का पानी” असा संदेश देत कठीण काळातील साथीबद्दल जनतेचे आभार मानले आहेत.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या समर्थकांनी आयकर विभागाच्या कारवाईचा निषेध केला आहे. त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी झाली होती व विविध गावचे पुढारी आणि आजी माजी पदाधिकारी सकाळपासूनच ठाण मांडून होते. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीही त्यांच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले होते.