फलटणला आज होणार पॉलिटीकल धमाका

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 14 ऑक्टोबर 2024 | फलटण | विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर फलटण – कोेरेगाव विधानसभा मतदारसंघ राज्यात चांगलाच गाजतोय. याच रणधुमाळीच्या निमित्ताने आज फलटण शहरात मोठा पॉलिटीकल धमाका पहायला मिळणार आहे. बघुयात या संबंधीचा स्पेशल रिपोर्ट.

फलटण – कोरेगांव विधानसभा मतदार संघावर गेली गेली 30 वर्षे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची अबाधित सत्ता आहे. माजी आमदार स्वर्गीय चिमणराव कदम, माजी खासदार स्वर्गीय हिंदुराव नाईक निंबाळकर या दोन दिग्गज नेत्यांशी कडवी झुंज देत श्रीमंत रामराजे तालुक्याची सत्ता स्वत:कडे ठेवण्यात यशस्वी झाले होते. गत पाच वर्षांपूर्वीच्या लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टीकडून रामराजेंचे विरोधक रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार झाले आणि त्यांच्या रुपाने प्रस्थापित राजे गटाला खासदार गटाकडून आव्हान निर्माण झाले. रणजितसिंहांनी तालुक्यातील रेल्वे, पाणी, रस्ते आणि रोजगार या चार प्रश्‍नांवर मोठा फोकस ठेवून केंद्रीय पातळीवरील यासाठी भरघोस निधी देखील आणला. यंदाच्या लोकसभा निवडणूकीत रणजितसिंह पराभूत जरी झाले असले तरी आपल्या कामगिरीच्या जोरावर तालुक्यातील मतांचा आकडा वाढवण्यात ते यशस्वी ठरले आहेत. आपल्या प्रस्थापित राजकारणासाठी नेमकी हीच धोक्याची घंटा रामराजेंनी ओळखून त्यांनी रणजितदांदांविरोधात राजकीय व्यूव्हरचना आखली आहे.

आगामी निवडणूकीसाठी महायुतीत ही जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुटणार आणि विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे राष्ट्रवादी आणि राजे गटाचे उमेदवार असणार असे मानले जात होते. दुसरीकडे रणजितदादांनी सचिन पाटील यांच्या उमेदवारीसाठी जोरदार कॅपेंनिंग करुन भाजपकडून त्यांनी आपण उमेदवारी मिळवून देणार असल्याचा दावा केला होता. सचिन पाटील यांना भाजपने उमेदवारी न दिल्यास रणजितदादा आपला उमेदवार अपक्ष उभा करणार की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पर्याय निवडणार अश्याही शक्यतांना उधाण आले होते. मात्र रामराजेंनी शरद पवारांविषयीची मतदारांमध्ये असलेली सहानुभूती आणि कार्यकर्त्यांमधली तुतारीची ओढ लक्षात घेवून आमदार दीपक चव्हाणांसह आपले बंधू श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, चिरंजीव श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, पुतणे श्रीमंत विश्‍वजीतराजे नाईक निंबाळकर यांनाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पाठवण्याचा निर्णय घेतलाय आणि आज या सगळ्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होत आहे. या घडामोडी घडवताना रामराजे मात्र अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबतच राहणार आहेत. स्वत:ला वगळून संपूर्ण गटाला दुसर्‍या पक्षात पाठवण्याचा आगळा – वेगळा पॉलिटीकल धमाका यानिमित्ताने रामराजे संपूर्ण राज्याला दाखवून देणार आहेत.

दुसरीकडे रामराजेंची भूमिका स्पष्ट झाल्यामुळे रणजितसिंहांनीही राजकीय हालचाली वेगाने सुरु केल्या असून महायुतीत फलटणची जागा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला घेण्याची नामी संधी त्यांना मिळाली आहे. याचाच भाग म्हणजे दोन दिवसांपूर्वीच फलटण शहरात मोठा मेळावा घेतल्यानंतर आज पुन्हा विविध विकासकामांचा शुभारंभ करुन शहरातील राजकीय सभांचे पारंपारिक स्थळ मानल्या जाणार्‍या गजानन चौकात त्यांनी जाहीर सभेचे आयोजन केले आहे. दुपारी 4 वाजता राजे गटाचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी 6 नंतर होणारी माजी खासदारांची सभा हा शहरातील आजचा एका मागोमाग एक दुसरा पॉलीटीकल धमाका मानला जात आहे.


Back to top button
Don`t copy text!