
स्थैर्य, फलटण, दि. १२ ऑक्टोबर : आसू येथील राजकीय वाद आता विकोपाला गेला असून, एका पत्रकार परिषदेत दिलेल्या स्पष्टीकरणाचा राग मनात धरून, सेवानिवृत्त विक्रीकर उपायुक्त रघुवीर माने-पाटील यांच्या घरात घुसून मद्यधुंद अवस्थेत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आमदार सचिन पाटील आणि सातारा जिल्हा बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या गुंडगिरीचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
काही दिवसांपूर्वी शिवरूपराजे खर्डेकर यांच्यावर आणि त्यांच्या संस्थेवर काही चुकीचे आरोप करण्यात आले होते, असे आमदार सचिन पाटील यांनी सांगितले. या आरोपांना वस्तुस्थिती मांडून उत्तर देण्यासाठी रघुवीर माने-पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. माने-पाटील यांनी कोणत्याही व्यक्तीवर वैयक्तिक टीका न करता, केवळ संस्थेच्या व्यवहाराची माहिती दिली होती, असे आमदार पाटील म्हणाले.
या पत्रकार परिषदेनंतर, त्याच रात्री काही व्यक्तींनी मद्यधुंद अवस्थेत रघुवीर माने-पाटील यांच्या घरात घुसून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असे शिवरूपराजे खर्डेकर यांनी सांगितले. “ज्यांनी हे कृत्य केले, त्यातील एक जण आमच्याच संस्थेतील एक शिक्षक आहे. शिक्षकच जर दारू पिऊन शिव्या देत असतील, तर पुढच्या पिढीने काय आदर्श घ्यावा?,” असा संतप्त सवाल खर्डेकर यांनी उपस्थित केला. “राजकारणात आम्ही वैयक्तिक टीका-टिप्पणी सहन करतो, पण घरात घुसून कुटुंबीयांना धमक्या देणे ही आमची संस्कृती नाही,” असेही ते म्हणाले. याप्रकरणी आम्ही पोलिसात गुन्हा दाखल केला असून, जे सत्य आहे तेच फिर्यादीत नमूद केले आहे, असे खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
या घटनेचा निषेध करत रघुवीर माने-पाटील म्हणाले, “मी एक ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिक आहे. माझ्या घरात घुसून दहशत निर्माण करण्याचा हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. मी कोणत्याही पक्षासाठी बोललो नाही, तर केवळ संस्थेची वस्तुस्थिती मांडली होती. जर सुशिक्षित लोकांना अशाप्रकारे लक्ष्य केले जात असेल, तर हा तालुका विकासाच्या राजकारणाऐवजी कोणत्या दिशेने चालला आहे, याचा विचार करण्याची गरज आहे”.

