
दैनिक स्थैर्य । दि.०३ एप्रिल २०२२ । सातारा । साताऱ्यात शुक्रवारी पोलीस दलाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील दोन मंत्री म्हणजे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई आणि सहकारमंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी हजेरी लावली. दोघेही एकाच मंचावर आल्याने दोघांनी एकमेकांना चांगलेचं चिमटे काढले.
या कार्यक्रमात शंभुराज देसाई म्हणाले की, ‘मी गृहराज्यमंत्री जरी असलो तरी पालकमंत्रीच जिल्ह्याचे मालक असतात, असं बाळासाहेब पाटील मघाशी म्हणाले. त्यामुळे ते जसं सांगतील त्याला होयबा म्हणायचं आणि पुढे जायचं’ अशा पद्धतीचा चिमटा शंभुराज देसाई यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना काढला. यानंतर बाळासाहेब पाटील यांनी देखील संधी सोडली नाही. ते म्हणाले की, ‘तुमच्या मतदारसंघातील पोलीसांना जास्त काम करावं लागतं. आपण गृहराज्यमंत्री आहात, त्यामुळे तालुक्यातील अधिकाऱ्यांना सजग, सतर्क रहावं लागतं. तरीही, आपण सुरक्षेसाठी हेल्मेट वापरलं पाहीजे.’ ‘गृहमंत्री सुद्धा बऱ्याच वेळा मोटरसायकलवरून फिरतात आम्ही तुमची बाईकवरून फिरतानाची क्लिप बघितली आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा हेल्मेट वापरलं पाहिजे. तुम्ही हेल्मेट वापरत नाही’, असं सांगत पाटलांनी देसाईंना कोपरखळी मारली.
सातारा पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा ते हेल्मेट वापरतात का हे बघावं, असं सुचक वक्तव्य बाळासाहेब पाटील यांनी केलं. खरंतर, शंभुराज देसाई हे पाटण मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडून आले आहेत तर बाळासाहेब पाटील हे राष्ट्रावादीकडून कराड उत्तर या मतदारसंघातून निवडून आले आहेत. दोघांचे पक्ष वेगळे आहेत आणि दोघेही परंपरागत राजकीय विरोधक आहेत. सध्या महाविकास आघाडी म्हणून जरी एकत्र काम करत असले तरी संधी भेटली की हे नेते एकमेकांना चिमटे काढणं आणि कोपरखळ्या मारणं अजिबात सोडत नाहीत. याचीच सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.