स्थैर्य, मुंबई, दि. ३१ : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्याप्रकरणीच्या चौकशी आणि घडामोडींना वेग आला आहे. पाटण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी ही चौकशी न करता सीबीआय मार्फत करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने आता पाटणा उच्च न्यायालयात सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, पोलिसांकडील तपास हा सीबीआयकडे हस्तांरतरित करण्यात यावा.
अभिनेता सुशांत यांना मुंबईत राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी चौकशी सुरु केली. दरम्यान, सुशांतच्या वडिलांनी बिहार राज्यातील पाटण्यामधील राजीव नगर पोलीस स्थानकातत्याची प्रेयसी, अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली. सुशांतच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यामुळे या प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे. रियाविरोधात FIR दाखल करण्यात आल्यानंतर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. अंकिताने सत्याचा विजय होतो, अशा आशयाची एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानंतर पोलिसांनी अंकिताचीही चौकशी केली आहे.
१५ कोटी रुपये, क्रेडीट कार्ड, पीन नंबर गायब असल्याने सुशांतसिंहच्या वडिलांनी म्हटले होते. त्यानंतर मुंबई आलेल्या बिहार पोलिसांच्या टीमने सुशांतसिंह राजपूतच्या बँक खात्यांची चौकशी सुरु केली आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचा जबाब नोंदवण्यात आला. जवळपास तासभर बिहार पोलिसांची टीम अंकिता लोखंडेच्या घरी होती. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अंकिताकडून मिळणारी माहिती देखील महत्त्वाची आहे. बिहार पोलिसांनी अंकिता लोखंडेचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आहे.
दरम्यान, पार्थ अजित पवार यांनीही सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांनी तसे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना एक प्रत्यक्ष भेटून निवेदनही दिले होते. सुशांतच्या आत्महत्येच्या सीबीआय चौकशीची मागणी होत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मात्र चौकशी सीबीआयकडे जाणार नसल्याचे म्हटले आहे. मुंबई पोलीस सध्या याची चौकशी करत आहे. मात्र, पाटण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पाटणा पोलीसही मुंबईत येवून चौकशी करत आहेत.