दैनिक स्थैर्य । दि. २२ फेब्रुवारी २०२२ । सातारा । सातारा शहरालगत असलेल्या वेदभवन कार्यालयात अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याचे माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तो रोखला. संबंधित कुटुंबांना विवाहापासून परावृत्त करुन शहर पोलिस ठाण्यात कारवाई करण्यासाठी त्यांना आणण्यात आले.
याबाबतची अधिक माहिती अशी, सातारा येथे १६ वर्षीय मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती स्थानिकांकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एक पथक तयार करुन वेदभवन हे मंगल कार्यालय गाठले. पोलिसांना पाहताच दोन्ही कुटुंबांचे धाबे दणाणले. पोलिसांनी सर्वांना शांततेचे आवाहन करुन मुलीच्या वयाबाबत विचारणा केली. यावेळी मुलीचे वय १६ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही कुटुंबियांना बाल विवाह व कायद्यासंबंधी माहिती दिली. पोलिसांनी विवाह रोखत असल्याचे सांगून पुढील कार्यवाहीसाठी संबंधित कुटुंबियातील सदस्यांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. रात्री त्यांच्यावर उशीरापर्यंत कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु होती.