
दैनिक स्थैर्य । 19 एप्रिल 2025। सातारा। मानसिक आजार शारीरिक व्याधींना निमंत्रण देणारे असतात. त्याचा पोलिसांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होतो. त्यामुळे तणावरहीत आयुष्य जगण्यासाठी पोलिसांनी नेहमी सकारात्मक रहावे, असे आवाहन प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ व परिवर्तन संस्थेचे मार्गदर्शक डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले.
जिल्हा पोलीस दल व परिवर्तन संस्था यांच्यावतीने पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी येथील अलंकार हॉलमध्ये मानसिक स्वास्थ्यासंबंधी कार्यशाळा झाली. यामध्ये 155 पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी भाग घेतला. त्यावेळी डॉ. दाभोलकर बोलत होते. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, मानसिक आरोग्य विभागाच्या कार्यक्रम समन्वयक रूपाली भोसले, योगिनी मगर उपस्थित होत्या.
दाभोलकर म्हणाले, चोरी, मारामारी, खून, दरोडा यासारख्या गुन्ह्यांच्या तपासामुळे पोलिसांना सतत नकारात्मक गोष्टींना सामोरे जावे लागते. त्यामुळे पोलिसांचे मानसिक स्वास्थ्य खराब होऊन, शारीरिक आजार होतात. हे शारीरिक आजार मनाशी संलग्न असतात. त्यातून बाहेर येण्यासाठी पोलिसांनी शास्त्रोक्त पद्धतीने मानसिक स्वास्थ्य संवर्धित करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी सतत सकारात्मक रहावे, असे आवाहन त्यांनी केले. रूपाली भोसले यांनी एमवायसीएम अॅपद्वारे मानसिक स्वास्थ्याबाबत माहिती दिली. पोलिसांनी विविध खेळ आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून कसे सकारात्मक रहावे, याचे मार्गदर्शन त्यांनी केले.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते आणि डॉ. हमीद दाभोलकर यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे उद्घाटन झाले. सातारा पोलीस दलाच्यावतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
वाढत्या उष्णतेवर उपाय आणि वृक्षारोपण यांचा परस्पर संबंध स्पष्ट करून डॉ. हमीद दाभोलकर यांनी त्यावर मार्गदर्शन केले. पोलिसांचे मानसिक स्वास्थ्य ही कार्यशाळा पोलिसांसाठी अत्यंत गरजेची आहे. दरवर्षी अशा कार्यशाळांचे आयोजन केले जावे, अशी सूचना या कार्यक्रमात करण्यात आली. मानसिक स्वास्थ्य केंद्राची उभारणी करणार असल्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले.