मराठा आरक्षण रद्द झाल्याने फलटण व साखरवाडीमध्ये पोलीसांचा रूट मार्च

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. ०६: सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी फलटण शहर व साखरवाडी येथे पोलिसांनी रुट मार्च काढला.

मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस अधिक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली व फलटणचे पोलिस उपअधिक्षक तानाजी बरडे यांच्या नेतृत्वाखाली हा रुट मार्च काढण्यात आला. फलटण शहरात महात्मा फुले चौकातून प्रारंभ झालेला हा रुट मार्च डेक्कन चौक, किर्ती स्तंभ चौक, उमाजी नाईक चौक, गजानन चौक ते महात्मा फुले चौक या मार्गावरुन काढण्यात आला. या रुट मार्चमध्ये नऊ पोलिस अधिकारी, चाळीस पोलिस कर्मचारी, सोळा एसआरपीएफ चे अंमलदार, अठरा होमगार्डसह पोलिस जीप, मोटार सायकल यांचा समावेश होता.

सध्या कोविड १९ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. मराठा आरक्षण अनुषंगाने जाहीर झालेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कोणीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करु नये असे आवाहन फलटण शहर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलिस निरीक्षक भारत किंद्रे यांनी केले आहे.

दरम्यान साखरवाडी ता. फलटण येथेही फलटण ग्रामीण ठाणे व लोणंद पोलिस ठाणे यांच्यावतीने संयुक्तरीत्या आज सायंकाळी रुट मार्च काढण्यात आला. सदरचा रूट मार्च साखरवाडी एसटी स्टॅण्ड, बाजारपेठ, चांदणी चौक ते एसटी स्टॅण्ड या मार्गावरुन काढण्यात आला. या रूट मार्चमध्ये सात पोलिस अधिकारी, ३२ पोलिस अंमलदार, १६ एसआरपीएफ चे अंमलदार, १८ होमगार्ड सहभागी झाले होते.


Back to top button
Don`t copy text!