स्थैर्य, मुंबई, दि.१७: महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस विभागातील भरतीमध्ये मराठा समाजाला 13 टक्के राखीव जागा देण्याची घोषणा केली. यासोबतच मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याबाबत अनिल देशमुख म्हणाले की, ‘मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. सरकारने 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पण ही पोलिस भरती करत असताना मराठा समाजासाठी 13 टक्के जागा बाजूला काढल्या जातील. यासाठी कायदेशीर बाबींची तपासणी करुन मराठा समाजाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे,’ अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
पोलिस भरती करण्यासारखे सध्या वातावरण नाही- संभाजीराजे
राज्यातील पोलिस विभागात 12 हजार 528 पदांसाठी पोलिस भरती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पण, या निर्णयावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘तुम्हाला मराठा समाजाला चिथावणी द्यायची आहे का?’ असा प्रश्न करत आरक्षणावर तोडगा निघेपर्यंत पोलिस भरती करू नका, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे का? – नितेश राणे
भाजप आमदार नितेश राणे यांनीही पोलिस भरतीवर टीका केली आहे. मराठा आरक्षण पुन्हा लागू होत नाही तोपर्यंत मेगा भरती करुन सरकार आगीत तेल टाकत असल्याचं ते म्हणाले. याबाबत त्यांनी ट्वीट केले की, “राज्यात इतिहासातली सर्वात मोठी मेगा भरती..मराठा आरक्षण स्थगित झाल्यावर ?? जो पर्यंत मराठा आरक्षण परत लागु होत नाही तो पर्यंत मेघा भरती कशाला ??? आगीत तेल टाकत आहात..जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे का??