स्थैर्य, फलटण, दि. ०२ : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी फेसबुक पोस्टद्वारे फलटण शहरातील वाढत्या जुगार अड्ड्यांबाबत आवाज उठवून पोलीसांकडे कारवाईची मागणी केल्यानंतर तात्काळ फलटण शहर पोलीसांनी याची दखल घेत शहरात विविध ठिकाणी अवैध रित्या चालवण्यात येणार्या ४ जुगार अड्ड्यांवर फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे व फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली धाडी टाकून धडक कारवाई केलीली आहे.
फलटण शहरात सोरट, चक्री, भिंगरी, मटका, सट्टा अशा वेगवेगळ्या प्रकारचे खेळ जुगार अड्ड्यांवर सुरु असून यामुळे तरुणाई उध्वस्त होत असून यातून मोठ्या प्रमाणावर पैशांची लुटमार सुरु आहे. त्यातच ९ एप्रिल पासून आय.पी.एल. क्रिकेट सामने सुरु होत असून या दरम्यान शहरात मोठ्या प्रमाणावर सट्टेबाजी सुरु होवू शकते. त्यामुळे फलटण पोलीसांनी तात्काळ अशा जुगार अड्ड्यांवर कारवाई करावी अन्यथा पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून आंदोलन करावे लागेल, अशा आशयाची फेसबुक पोस्ट श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी लिहून पोलीस प्रशासनाला एक प्रकारे जाग आणण्याचे काम केले होते. श्रीमंत रघुनाथराजेंच्या त्या पोस्टची चर्चा सर्वत्र सुरु असतानाच, फलटण शहर पोलीसांनी शहरातील महात्मा फुले मंडई, भवानी मार्केट परिसर, तेली गल्ली, जिंती नाका या भागात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यांवर छापे टाकून कारवाई केली आहे.
महात्मा फुले मंडईत ‘चक्री’
दि. ३१ मार्च रोजी शहरातील महात्मा फुले मंडई येथे अभिजीत बार शेजारी मोकळ्या जागेत संशयित आरोपी सुनील मोतीराम पवार (वय 38), रा.बुधवार पेठ, फलटण हा लोकांकडून पैसे घेऊन ऑनलाईन गेम / चक्री नावाचा जुगार चालवीत असताना त्याच्यावर पोलीसांनी कारवाई करुन रोख रक्कम 10 हजार 700 आणि एक पांढर्या रंगाचा प्लॅस्टिकचा फ्लेक्स ताब्यात घेतला. याबाबतची फिर्याद फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई सुजित मेगावडे यांनी दिली असून आरोपी विरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुळ हे करीत आहेत.
भवानी मार्केट परिसरात ‘मटका’
दि.31 मार्च रोजी रविवार पेठ, बस स्टँडसमोर भवानी मार्केट भिंतीलगत संशयित आरोपी सुरज दिलीप काकडे (वय 32), रा.मंगळवार पेठ, फलटण हा स्वत:च्या फायद्याकरिता मटका घेताना 840 रुपये रोख, 1 पेन व मटक्याचे आकडे लिहिलेले एक स्लिप बूक या साहित्यासह पोलीसांना आढळून आला. याबाबतची फिर्याद फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई अच्युत जगताप यांनी दिली असून आरोपी विरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक लोंढे करीत आहेत.
तेली गल्लीत ‘पत्त्याच्या पानावर जुगार’
दि.31 मार्च रोजी तेली गल्ली, शुक्रवार पेठ, फलटण येथे गंगतीरे याच्या राहत्या घरात पत्त्याच्या पानावर जुगार खेळत असताना पोलीसांनी रंगेहाथ पकडले. सदर कारवाईत रोख रुपये २१ हजार ३५०/-, खुर्च्या, टेबल फॅन, पत्त्याची पाने पोलीसांनी हस्तगत केली आहेत. यामध्ये सचिन सुभाष चव्हाण (वय 37), रा.लक्ष्मीनगर, फलटण, बाळू हनुमंत काळे (वय 54), रा. दत्तनगर, फलटण, मुस्ताक मेहबूब शेख (वय 58), रा. कसबा पेठ, फलटण, मुनीर अहमद महात (वय 48), रा.फलटण, अखील बसू शेख (वय 48), रा.लक्ष्मीनगर, फलटण, गिरधारी मोहनलाल लोहान (वय 54), रा. मारवाड पेठ, फलटण व हनुमंत गगतीरे, रा. मारुती मंदीर या 7 आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. गुन्ह्याची फिर्याद पोलीस शिपाई अच्युत जगताप यांनी दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार काकडे हे करीत आहेत.
जिंती नाक्यावर ‘चक्री’
दि.1 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वा. 40 मि. वाजण्याच्या सुमारास जिंती नाका, फलटण येथील यशवंतराव चव्हाण पुतळ्याचे उत्तर बाजूस बंद शटरच्या गाळ्यात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीसांनी धाड टाकली. संशयित आरोपी मनोज आत्माराम जाधव, रा.जिंती नाका याने स्वत:च्या फायद्याकरिता ऑनलाईन चक्री जुगरी खेळण्यासाठी इसमांकडून रोख रक्कम स्वीकारुन जुगार चालवत असताना पोलीसांना आढळून आला. कारवाईदरम्यान सदर बंद खोलीत रोख रक्कम 1 लाख 69 हजार 750/-, तोशीबा कंपनीचा टीव्ही, 1 काँप्युटर, कीबोर्ड, माऊस, केबल, जिओ कंपनीचा इंटरनेट डोंगल, एक लहान टेबल, एक मोठा टेबल, प्लास्टिक खुर्ची, चार प्लॅस्टिक स्टू, दोन पाण्याचे जार, दोन मोटारसायकली असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्या विरोधात ज्ञानेश्वर उत्तम राजगुरु, रा.मलटण, सुरज राजू जाधव, रा.मलटण, सागर बाबुराव जाधव, रा.जिंती नाका, वैभव संजय निंबाळकर, रा.विंचुर्णी, अतुल शिवाजी जाधव, रा.जिंती नाका, वसंत चव्हाण, रा.जिंती नाका, रवींद्र बाळू चव्हाण, रा.पलूस, जि.सांगली, मनोज आत्माराम जाधव, रा.जिंती नाका, आकाश भाऊसाहेब सावंत, संतोष वसंत जाधव, रा.जिंती नाका या 10 आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. गुन्ह्याची फिर्याद पोलीस शिपाई अच्युत जगताप यांनी दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.
दरम्यान, फलटण शहर पोलीसांच्या या कारवाईनंतर याच संदर्भात श्रीमंत रघुनाथराजेंनी आणखीन एक पोस्ट लिहून, जुगार अड्डे चालवणार्यांकडून लोकांची कशी आर्थिक लुट होते हे पोलीसांच्या लक्षात आले असेल अशी अपेक्षा व्यक्त करुन शहरात हे जुगार अड्डे पुन्हा सुरु होणार नाहीत याबाबत पोलीसांनी दक्षता घ्यावी. शिवाय ९ एप्रिल पासून सुरु होणार्या आय.पी.एल. सामन्यांच्या पार्श्वभूमीवर अशा अवैध धंद्यांवर बारकाईने लक्ष ठेवावे, अशी अपेक्षा श्रीमंत रघुनाथराजे यांनी व्यक्त केली आहे.