दैनिक स्थैर्य । दि.०९ फेब्रुवारी २०२१ । फलटण । फलटण तालुक्यातील मौजे राजुरी येथील पोलीस पाटलाच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर राजुरी गावचे पोलीस पाटील लक्ष्मण सुहास बागाव यास पोलीस पाटील पदावरून निलंबित करण्यात आले असून उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी याप्रकरणी आदेश काढून निलंबन कार्यवाही केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील राजुरी गावचे पोलीस पाटील लक्ष्मण सुहास बागाव यांचे विरुद्ध अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दिनांक 2 फेब्रुवारी रोजी 6:42 वाजता अटक करणत आलेली होती. त्यास दिनांक 3 फेब्रुवारी रोजी जिल्हा सत्र न्यायालय सातारा येथे हजर केले असता त्यांना २ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली होती. यानंतर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १९६७ चे कलम ११ अन्वये उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी राजुरी पोलीस पाटील लक्ष्मण सुहास बागाव यास पोलीस पाटील पदावरून तात्काळ निलंबित करण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून काढण्यात आला आहे.