दैनिक स्थैर्य । दि.०८ एप्रिल २०२२ । फलटण । भाडळी गावचे पोलीस पाटील हणमंतराव सोनवलकर यांनी ज्याप्रकारे पोलीस पाटील पद व व्यवसाय दोन्ही गोष्टींचा समतोल साधला आहे. त्याप्रमाणे इतरही पोलीस पाटलांनी स्थानिक पातळीवर व्यवसाय करून आपली आर्थिक बाजू सांभाळत पोलीस पाटील पदाला न्याय देण्याचे काम करावे असे आवाहन यावेळी अरविंद मेहता यांनी केले.
भाडळी गावचे पोलीस पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाडळी बु., भाडळी खु. व सासकल येथील युवकांनी शुभेच्छा देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमास भाडळी पंचक्रोशीतील शेकडो लोक उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार व महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेचे मार्गदर्शक अरविंद मेहता, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष दुधेबावी गावचे पोलीस पाटील हणमंतराव सोनवलकर पाटील, सातारा जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे प्रदीप गाढवे, तालुका संघटनेचे कार्याध्यक्ष दत्तात्रय सरक, उपस्थित होते.
यावेळी भाडळी पंचक्रोशीतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेतुन यश संपादन करून आर. टी. ओ. पदी निवड झालेल्या कोमल डांगे व विनोद लोणकर, तसेच कॅनरा बँक पदोन्नती बद्दल विशाल सोनवलकर यांचेही सत्कार करण्यात आले.
फलटण सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये यश संपादन करून प्रशासनात सहभागी व्हावे व ग्रामीण भागाची जाण असणारा अधिकारीवर्ग निर्माण झाल्याने आपोआपच ग्रामीण भागाचा विकास झाल्यावाचून राहणार नाही. प्रशासनात ग्रामीण भागातील अधिकारी तयार करण्यासाठी जनतेचे प्रतिनिधी व प्रशासनाचे प्रतिनिधी पोलीस पाटील यांनी एकत्रित येऊन काम केल्यास नक्कीच मोठे यश संपादन होऊ शकते.फलटण तालुक्यातील सर्व पोलीस पाटील अतिशय चांगल्या प्रकारचे कामकाज करत असून सबंध महाराष्ट्र मध्ये फलटण तालुका पोलीस पाटील संघटनेचे एक अनोखी ओळख निर्माण झाली आहे. तमाम महाराष्ट्रातील पोलीस पाटलांचे प्रश्न सोडवण्यासाठी फलटण तालुका पोलीस पाटील संघटनेने पुढाकार घेऊन विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब यांच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये ग्रह विभाग, महसूल विभाग व वित्त विभाग यांच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक लावून पोलीस पाटलांच्या समस्या, अडचणी, मागण्या विस्तृतपणे त्यांच्यासमोर मांडल्या व आज त्या सोडवण्यासाठी मंत्रालय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. असे गोरवोद्गार यावेळी अरविंद मेहता यांनी काढले.
यावेळी फलटण तालुक्यातील विविध गावचे पोलीस पाटील बरोबरच पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, मोहनराव डांगे, शशिकांत सोनवलकर तसेच भाडळी बुद्रुक व भाडळी खुर्द सासकल या गावचे सरपंच उपसरपंच,सस्कल जन आंदोलन समिती चे पदाधिकारी,विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे पदाधिकारी व अनेक युवक उपस्थित होते.