दैनिक स्थैर्य । दि.०९ मार्च २०२२ । फलटण । फलटण तालुक्यात पोलीस पाटील भरती प्रक्रिया व्यवस्थित सुरु असून दि. १३ रोजी लेखी आणि दि. १६ रोजी तोंडी परीक्षा घेण्यात येत असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.
फलटण तालुक्यातील ३५ गावात पोलीस पाटील पदे रिक्त असून या सर्व गावातील पोलीस पाटील पदे परीक्षेद्वारे भरण्यात येणार आहेत, त्यासाठी आरक्षणे निश्चित करुन उमेदवारी अर्ज दाखल करणे, दाखल अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे प्रांताधिकारी डॉ. जगताप यांनी सांगितले.
सर्व ३५ गावांसाठी भरती प्रक्रिया कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्यानुसार ३५ पैकी ६ गावांसाठी एकही अर्ज दाखल झाला नाही, उर्वरित २९ गावांसाठी २१४ अर्ज दाखल झाले आहेत, सर्व दाखल अर्जांची छाननी पूर्ण करण्यात आली असून १९ अर्ज अवैध १९५ अर्ज वैध ठरले असल्याचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी सांगितले आहे.
या २९ गावातील पोलीस पाटील भरतीसाठी दि. १० मार्च पासून तलाठी यांचे मार्फत संबंधीत परीक्षार्थींना हॉल तिकीट वाटप सुरु करण्यात आले आहे.
दि. १३ रोजी सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यांच्या निगराणीत मुधोजी हायस्कूल, फलटण येथे लेखी परीक्षा घेण्यात येत आहे, त्यासाठी बहुपर्यायी प्रश्न पत्रिका काढण्यात येत असून ४ पैकी १ बरोबर उत्तरावर खूण करावयाची आहे. OMR पद्धतीने ही ८० मार्कांची परीक्षा घेण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
लेखी परीक्षेनंतर दि. १६ मार्च रोजी २० मार्कांची तोंडी परीक्षा घेऊन लगेचच निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी डॉ. जगताप यांनी सांगितले आहे.