दैनिक स्थैर्य । दि. २८ सप्टेंबर २०२१ । सातारा । सातारा शहर परिसरात राहणाऱ्या युवतीचा दुचाकीवरुन पाठलाग करत तीला व तिच्या भावांना सातारा शहर वाहतुक शाखेसमोर काल मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहर परिसरात एक युवती राहण्यास असून काल ती दुचाकीवरुन राजवाडा येथून पोवईनाक्याकडे निघाली होती. यावेळी तीचा बॉबी ॲन्थोनी ब्रुक्स, पवन दत्तात्रय जाधव, अभिजीत रामशंकर जयस्वाल (रा. सातारा) यांनी पाठलाग सुरु केला. पाठलाग करत असतानाच त्या तिघांनी युवतीला उद्देशून अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. यास सोबत असणाऱ्या युवतीच्या भावाने आक्षेप घेतला. युवती दुचाकीवरुन सातारा शहर वाहतुक शाखेजवळ आली असतानाच ब्रुक्स, जाधव, जयस्वाल यांनी युवतीची दुचाकी अडवली. दुचाकी अडवल्यानंतर त्या तिघांनी युवतीला खाली खेचत धक्काबुक्की तसेच शिवीगाळ केली. सदर भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या त्या युवतीच्या भावांना तिघांनी मारहाण केली तसेच त्यांच्याकडे असणाऱ्या मोबाईलची तोडफोड केली.
रस्त्यावर सुरु असणारा गोंधळ पाहून वाहतुक पोलिस त्याठिकाणी आले व त्यांनी युवती, तिच्या भावांची हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका करत मारहाण करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. यानंतर त्यांना सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याची तक्रार त्या युवतीने सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंदवली असुन ब्रुक्स, जाधव, जयस्वाल यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याचा तपास उपनिरीक्षक उस्मान शेख हे करीत आहेत.