स्थैर्य, सातारा, दि.२०: अन्यायकारक विजबिल वसुली विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृष्णानगर येथे रास्ता रोको आंदोलन केले. महावितरण कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु शेट्टी यांचे नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात अन्यायकारक वीजबिल वसुलीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. सातारा महावितरण कंपनीच्या विरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा यांचे वतीने सातारा- कोरेगाव रोडवर महावितरण कार्यालय कृष्णानगर समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी रास्ता रोको करून घोषणाबाजी केली. सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यावसायिक, घरगुती ग्राहक शेतीपंप धारक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्यासह पदाधिकारी आणि पोलिसांच्यात रास्ता रोको दरम्यान धरपकड झाली. आंदोलक कार्यकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस आणि आंदोलक यांच्यात धरपकडीवरून जोरदार शाब्दिक चकमक झाली.
तुम्हाला फक्त 3 महिन्याचं वीजबिल माफ करा येवढीच मागणी होती. ते तुम्ही अडचणीच्या काळात माफ करणार नाही तर कधी करणार असा सवाल जिल्हाध्यक्ष राजु शेळके यांनी केला. शेती पंपाची वीज 22% शेतकरी पण वापरत नाही त्यात तुम्ही 8 तास वीज पुरवता म्हणजे महिन्यातून 8 दिवस देखील वीज देत नाही आणि तुम्ही वसुली कशी काय करता असा प्रश्न जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी केला.