
स्थैर्य, फलटण, दि. 24 ऑगस्ट : आगामी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी फलटण उपविभागीय पोलीस दल सज्ज झाले आहे. याचाच एक भाग म्हणून, आज सायंकाळी फलटण विमानतळ येथे ‘दंगा काबू योजने’चे प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या घेण्यात आले.
वाई उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा फलटण उपविभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे बाळासाहेब भालचीम यांच्या नेतृत्वाखाली हे प्रात्यक्षिक पार पडले. सण-उत्सवाच्या काळात अचानक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास परिस्थिती कशी हाताळावी, यासाठी आवश्यक असलेल्या सर्व कवायती यावेळी करण्यात आल्या.
या प्रात्यक्षिकामध्ये फलटण उपविभागातील ६ पोलीस अधिकारी, ३६ पोलीस अंमलदार आणि दंगा काबू पथकाची एक आरसीपी प्लाटुन सहभागी झाली होती. यावेळी विमानतळ परिसरात उपस्थित असलेल्या काही नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे या प्रात्यक्षिकात सहभाग नोंदवला. या कवायतींमुळे पोलीस दल कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.