स्थैर्य, सातारा, दि. २३ : सातारा येथील पोवई नाका परिसरात विनाकारण रस्त्यावर फिरणार्या वाहन चालकांवर पोलिसांनी धडक कारवाई केली. त्यांच्यावर जाग्यावरच दंडात्मक कारवाई करत त्यांना सातारा शहरात विनाकारण न फिरण्याच्या सूचना सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी दिल्या. 30 पेक्षा अधिक जणांचे पोलीस पथक अचानक रस्त्यावर उतरल्यामुळे वाहन चालकांची चांगलीच पळापळ झाली. सातारा शहरात आज पोलिसांनी अशा वाहन चालकांवर धडक कारवाई केली.
दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत खुली करण्यात आली होती.
सातारा जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी 17 ते 22 जुलै या काळात जिल्ह्यात लॉकडाउन जारी केला होता. या काळात जिल्ह्यातील सर्व किराणा दुकाने, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, इतर व्यवसाय करणारी दुकाने, भाजीपाला मंडई, वाईन शॉप, बिअर बार परमिट रूम, हॉटेल्स पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. तदनंतर जिल्ह्यासह सातार्यात अंशत: लॉकडाउन अत्यावश्यक सेवेचा पुरवठा करणारी दुकाने, ठोक विक्रेते, भाजीपाला, मटण, चिकन, मासे, फळविक्रेते आठवडी व दैनंदिन बाजार आज सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सातारकर घराबाहेर पडू लागले. रस्त्यावर सर्वत्र दुचाकी, चारचाकी वाहने निदर्शनास येऊ लागल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे पोलीस पथकासह पोवई नाका येथे दाखल झाले. त्यांनी त्या ठिकाणी वाहतूक शाखेच्या पोलिसांसह राखीव पोलीस दलातील पोलीस कर्मचार्यांना पाचारण केले. 30 पेक्षा अधिक पोलीस कर्मचार्यांनी पोवई नाका येथे अचानक दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना अडवत त्यांच्याकडे विचारपूस सुरू केली. जे अत्यावश्यक सेवेत कार्यरत आहेत, त्या वाहनचालकांना सोडून दिले. मात्र विनाकारण रस्त्यावर वाहन घेऊन फिरत आहेत त्यांच्यावर जाग्यावरच दंडात्मक कारवाई करून त्यांना कडक शब्दात समज देण्यात आली.
दरम्यान, 6 दिवसानंतर आज शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडण्यात आल्यामुळे नागरिकांनी किराणा माल, भाजीपाला खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी केली होती. काही दुकानांच्या बाहेर तर रांगा लागल्या होत्या.