दैनिक स्थैर्य | दि. १४ जुलै २०२३ | फलटण |
‘मराठा वनवास यात्रा’ या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी गेल्या दोन महिन्यांपासून आझाद मैदानावर आंदोलन करणार्या योगेश केदार आणि त्यांच्या सहकार्यांचे हाथरूण, पांघरूण व इतर साहित्य जप्त करून पोलिसांनी आंदोलन मोडीत काढून बुधवारी रात्री त्यांना अटक केली. या आंदोलकांवर दंडेलशाही करून पोलिसांनी त्यांचे आंदोलन चिरडले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आहे. आंदोलकांवर होणारी ही कारवाई त्वरित थांबवावी, असे निवेदन क्षत्रीय मराठा प्रतिष्ठान, फलटण व मराठा क्रांती मोर्चा, फलटण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
निवेदनात आंदोलकांनी म्हटले आहे की, ‘मराठा वनवास यात्रा’ या माध्यमातून तुळजापूर ते मुंबई (आझाद मैदान) भर उन्हात ४२ ते ४५ अंश डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये पायी प्रवास करत श्री. योगेश केदार आणि त्यांचे सहकारी हे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून ५०% च्या आत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेली दोन महिने उन्हात, पावसात मुंबईच्या आझाद मैदानावर लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत. मात्र, १२ जुलै रोजी रात्री अचानक कोणतीही पूर्वकल्पना न देता पोलिसांनी मराठा समाजाचा संवैधानिक हक्क हिरावून घेत आंदोलन करणार्यांवर कारवाई करत आंदोलकांच्या चारचाकी गाड्या, रात्री झोपण्यासाठी लागणारे हांथरूण, पांघरूण, मोबाईल तसेच कपडे व इतर गोष्टी जप्त करून हे आंदोलन मोडीत काढत आंदोलकांवर दंडेलशाही केली. तसेच त्यांना अटक केली.
राज्य सरकारने आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन आंदोलकांवर होत असणारी कारवाई त्वरित थांबवावी आणि मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून ५०% मधून आरक्षण मिळवून द्यावी, अशी आमची मागणी आहे, असे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्षत्रीय मराठा प्रतिष्ठान, फलटण व मराठा क्रांती मोर्चा, फलटण यांनी दिले आहे.