
स्थैर्य, सातारा, दि. २८ ऑगस्ट : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी सिस्टीम लावणाऱ्या गणेश मंडळांवर सातारा तालुका पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी पोलिसांनी संबंधित मंडळ अध्यक्ष, डॉल्बी मालक आणि वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सातारा तालुका पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २६ ऑगस्ट रोजी ढेबेवाडी गावात दोन गणेश मंडळांनी आगमन मिरवणुकीत मोठ्या आवाजात डॉल्बी सिस्टीम लावली होती. या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना त्रास होत होता तसेच सार्वजनिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. याबाबत नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व नियमभंग झाल्याचे निश्चित केले.
पोलिसांनी मिरवणुकीचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून, त्या आधारे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडली. गणेशोत्सव मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांना परवानगी देण्यात येईल, मात्र विनापरवाना डॉल्बी लावल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आवाहन सातारा तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. निलेश तांबे यांनी केले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर आणि सातारा उपविभागीय अधिकारी श्री. राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमध्ये प्रभारी अधिकारी श्री. निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखालील पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. विनोद नेवसे, पोलीस हवालदार राजू शिखरे, मनोज गायकवाड, पंकज ढाणे, दादा स्वामी, निकम, पोलीस नाईक प्रदीप मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पांडव आणि शंकर गायकवाड यांनी सहभाग घेतला.