स्थैर्य, मुंबई, दि.८: रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी यांना रविवारी रायगड जिल्ह्यातील तळोदा तुरुंगात शिफ्ट करण्यात आले आहे. पोलिसांचा दावा आहे की, न्यायालयीन कोठडीत असताना अर्णब मोबाइल फोनचा वापर करत होते, त्यामुळेच त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. इंटीरिअर डिझायनर अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपात त्यांना अलीबागच्या एका शाळेतील क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांनी 4 नोव्हेंबरला अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा मोबाइल फोन जप्त करण्यात आला होता. पण, रायगड क्राइम ब्रांचच्या लक्षात आले की, अर्णब इतर कोणाच्यातरी मोबाईलवरुन सोशल मीडियाचा वापर करत होते. दरम्यान, तळोदा तुरुंगात शिफ्ट करताना गोस्वामी यांनी मोठ्याने ओरडत आरोप केला की, शनिवारी संध्याकाळी अलीबाग तुरुंगात त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच, त्यांच्या जीवाला धोका असून, त्यांना त्यांच्या वकिलांनाही भेटू देत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.