
स्थैर्य, फलटण, दि. ०२ : सध्या फलटण शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. म्हणूनच फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दि. ०२ मे ते दि. ०८ मे पर्यंत फलटण शहर व तालुक्यातील ८ गावे ही प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे. फलटण शहरासह तालुक्यातील घोषित ८ गावांमध्ये वैद्यकीय सेवांच्या शिवाय अन्य सर्व अत्यावश्यक सेवा सुध्दा बंद राहणार आहेत. सदर आदेशाच्या अनुषंगाने फलटण शहरात नाकाबंदी करण्यात आलेली आहे. सदर नाकाबंदीमध्ये विनाकारण फिरणार्यांची वाहने जप्त करण्यात आलेली आहेत, अशी माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे निरिक्षक भारत किंद्रे यांनी दिली.
या वेळी बोलताना पोलीस निरीक्षक भारत किंद्रे म्हणाले की, फलटण शहरामध्ये कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने दि. ०२ मे ते ते दि. ०८ मे पर्यंत फलटण शहर व शहराचे आसपासचा परिसर हा कटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या व्यक्तींची चौकशी करून विनाकारण फिरणारी एकूण 40 वाहने डिटेन केली आहेत. डिटेन केलेली वाहने वाहन मालकांना आठ दिवसानंतर ताब्यात देण्यात येणार आहेत. तरी कोणीही नागरिक विनाकारण फलटण शहरात फिरणार नाहीत या बाबत दक्षता घ्यावी.