
स्थैर्य, फलटण, दि. २४ ऑगस्ट : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, फलटण शहरात ध्वनी आणि प्रकाश प्रदूषण रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी सर्व नोंदणीकृत गणेश मंडळांना मे-जून महिन्यातच नोटिसा बजावून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. या भूमिकेला फलटण ज्येष्ठ नागरिक सुरक्षा दक्षता कमिटीनेही पाठिंबा दिला असून, डीजे आणि लेझर लाईट्सच्या अतिवापरावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पोलीस प्रशासनाने मंडळांना दिलेल्या नोटीसमध्ये, उच्च न्यायालयाचे आदेश आणि ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) अधिनियम, २००० नुसार आवाजाची मर्यादा पाळण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सणासुदीसाठी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी असली तरी, विहित डेसिबल पातळीचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, असे बजावण्यात आले आहे. मागील वर्षी नियम मोडणाऱ्या काही मंडळांवर कारवाई करण्यात आल्याची आठवणही नोटीसमध्ये करून देण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिकांची कळकळीची विनंती
फलटण ज्येष्ठ नागरिक सुरक्षा दक्षता कमिटीने पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात, दि. २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात आगमन व विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे, डॉल्बी आणि लेझर लाईट्सच्या मोठ्या आवाजामुळे वृद्ध, आजारी व्यक्ती, लहान बालके आणि गर्भवती महिलांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे याला एक सामाजिक प्रश्न म्हणून गांभीर्याने घ्यावे व योग्य उपाययोजना करावी, अशी विनंती कमिटीचे अध्यक्ष शांताराम विष्णू आवटे आणि जिल्हा समन्वयक आनंदराव रामचंद्र शिंदे यांनी केली आहे.
पोलिसांचे सांस्कृतिक उत्सवासाठी आवाहन
पोलिसांनी डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा आणि ढोल-ताशा पथकांचा वापर करून लोकसंस्कृतीचे जतन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, महिला, तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी समाजोपयोगी व आदर्श उपक्रम राबवून उत्सवाला सामाजिक स्वरूप द्यावे, असेही नोटीसमध्ये नमूद केले आहे.