स्थैर्य, सातारा, दि. 22 : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व पर्यटनस्थळे बंद असताना कास पठार परिसरात स्थानिक नागरिक आणि पर्यटक गर्दी करत आहेत. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत, सोशल डिस्टन्सिंग न पाळता या ठिकाणी युवक- युवतींची गर्दी वाढली आहे. कास रस्त्यावरील काही हॉटेल चालकांकडूनही नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे सातारा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत 72 वाहनांवर कारवाई करत 17 हजार 900 रुपयांचा दंड वसूल केला.
करोना संसर्गात मंदिरे आणि पर्यटनस्थळे बंद आहेत. पाचगणी व महाबळेश्वर बंद ठेवून स्थानिकांनी कडकडीत बंद पाळला आहे. सध्याच्या पावसाने कास-ठोसेघर हा परिसर हिरवागार झाला आहे. या पठारावर हुल्लडबाजी करणार्यांची गर्दीही वाढत आहे. सातारा तालुका पोलिसांनी यवतेश्वर नाक्यावर कास पठाराकडे गेलेल्या सातारा शहरातील युवक- युवतींना अडवत त्यांच्यावर कारवाई केली. या परिसरात फिरण्यास मज्जाव असतानाही सातारकर कोरोना संसर्गाचे कोणतेही नियम न पळता गर्दी करीत असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.
सातारा ते कास या भागात दिलेल्या वेळेपेक्षा अतिरिक्त वेळ हॉटेल सुरू ठेवल्याने जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले होते. त्यामुळे या हॉटेलांवर कारवाई करत त्यांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कास पठार आणि परिसरात फिरण्यासाठी येणार्या वाहनांवर मोटार वाहन कायद्याप्रमाणे 72 गुन्हे दाखल करून 17 हजार 900 रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आला आहे तसेच यापुढेही अशाच प्रकारची सक्त कारवाई करण्यात येणार असल्याने कोणीही विनाकारण कास पठार, ठोसेघर धबधबा परिसरामध्ये फिरण्यासाठी येऊ नये, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
पावसाळी वातावरणामुळे कासकडे स्थानिक पर्यटकांचा खास करून महाविद्यालयीन युवक-युवतींचा ओढा वाढला आहे. त्याचप्रमाणे मद्यपींचाही ओढा वाढला आहे. आता तर आकाड सुरू झाला असल्यामुळे मद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणून या ठिकाणी मोठी गर्दी होणार हे गृहीत धरून पोलिसांनी जागोजागी चेक पोस्ट सुरू करून प्रत्येक वाहनाची काटेकोरपणे तपासणी करावी तसेच प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर सक्तीची कारवाई करावी.