स्थैर्य, सातारा, दि. 16 : 16 जुलै ते 3 ऑगस्टपर्यंत बिंदू नामावली तपासणी करण्याबाबतचा धडक कार्यक्रम माध्यमिक शिक्षण विभागाने आयोजित केला होता. मात्र करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे 17 ते 26 जुलै या कालावधीत जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. आता हा तपासणीचा कार्यक्रम 27 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत होणार असल्याची माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाळांना 20 ते 40 टक्के अनुदान वितरीत करण्यासंदर्भात बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये अनुदानास पात्र घोषित केलेल्या शाळा या बिंदू नामावलीच्या अटींची पूर्तता करत नसल्यामुळे वित्त विभागास निधीची अडचण येत आहे. त्यानुसार सर्व शाळांची बिंदू नामावली धडक कार्यक्रम राबवून 2 महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.
सातारा जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्थांनी आपल्या शिक्षण संस्थाची बिंदू नामावली तयार करण्यात येणार आहे. 16 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीत हा कार्यक्रम होणार होता. जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
27 जुलै – फलटण, 28 जुलै – माण, 29 जुलै – खटाव, 30 जुलै – सातारा, 31 जुलै – कोरेगाव, 3 ऑगस्ट – पाटण, 4 ऑगस्ट – वाई, 5 ऑगस्ट – कराड, 6 ऑगस्ट – जावळी, 7 – खंडाळा, 10 ऑगस्ट – महाबळेश्वर या वेळापत्रकाप्रमाणे माध्यमिक शिक्षण विभागाकडून प्रथम तपासणी करून घेवून अंतिम तपासणी आयुक्त मागासवर्गीय कल्याण, पुणे यांच्या कार्यालयाकडून तपासून पूर्ण करण्यात येणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.