कवींनी संवेदनशील असले पाहिजे – ताराचंद आवळे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० ऑक्टोबर २०२२ । फलटण । मानवी जीवनात साहित्य हे जगण्यासाठी दिशादर्शक म्हणून काम करत असते. साहित्यात कमी शब्दात जास्त आशय मानवी मनावर रुजवण्याचे कार्य कविता करीत असते. कविता व कवी यांचे स्थान मोलाचे आहे. कोणताच कवी ज्येष्ठ,श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असत नाही, त्याची कोणतीही कविता जेव्हा नव्याने जन्माला येते तेव्हा तो कवी त्या कवितेसाठी नवकवी असतो त्यामुळे कवींनी संवेदनशील असले पाहिजे असे मत ज्येष्ठ साहित्यिक ताराचंद आवळे यांनी गुरुकुल विद्यालय खंडाळा जिल्हा सातारा येथे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा खंडाळा, सुजन फाऊंडेशन व ग्रामस्वराज्य युवा सामाजिक संस्था खंडाळा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय काव्यमैफलीत व्यक्त केले.

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक विलासराव पिसाळ होते. व्यासपीठावर मसाप शाखा खंडाळा शाखा अध्यक्ष विलास वरे, युवाकवी अविनाश चव्हाण, सुजन फाऊंडेशनचे अध्यक्ष अजित जाधव, सामाजिक कार्यकर्त्यां शीतल महांगडे उपस्थित होते.

ताराचंद्र आवळे पुढे म्हणाले की, सर्व कवींनी इतर कवी व त्यांच्या कवितेबद्दल आदरभाव ठेवून आपला सन्मान आपणच राखला पाहिजे.सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात आपण मागे राहून चालणार नाही, सोशल मीडियावर सक्रिय होणे गरजेचे आहे तरच आपली कविता सर्वदूर पोहोचेल व आपल्याला योग्य न्याय मिळेल. शहरी व ग्रामीण हा दुरावा दूर करण्यासाठी हा मार्ग सर्वोत्तम आहे.त्यांनी कवी व कवितेची लायकी या कवितेतून सध्याचे वास्तव चित्र मांडले.

काव्य मैफलीचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक विलासराव पिसाळ म्हणाले की, वाचन संस्कृती वाढीस लागली पाहिजे त्यासाठी सर्वांनी सक्रिय झाले पाहिजे.त्यांनी छावणी ही कविता सादर करून पुढारी, भ्रष्टाचार,जनावरे व शेतकर्याची व्यथा मांडली तसेच कविता कशी जन्मते व ती कशी सादर करावी याविषयी मार्गदर्शन केले.

या काव्य मैफलीत गंगाराम कुचेकर,अविनाश चव्हाण, सुनीता साबळे, तानाजी शिंदे, लक्ष्मण पाटील, जगन्नाथ विभुते, जयकुमार खरात, आकाश आढाव, समीना शेख, जयश्री माजगावकर ,रुपाली नेवसे,नितीन नाळे,प्रताप महांगडे,दीपक क्षीरसागर, गणेश गजफोडे,सावंत सर, प्रतीक्षा आढाव यांनी विविध ढंगातील, विविध रसातील कविता सादर करून रसिकांची मने जिंकली व टाळ्यांची दाद मिळाली. लावणी, गझल, मंगलाष्टक, प्रेम, थोर विभूती, मित्र, मिसरी,कावड,राजकारणी, निसर्ग, हेडमास्तर, किन्नर,बाईपण, व्यसनमुक्ती, अभंग अशा विविधांगी कविता सादर केल्या.

यावेळी पत्रकार मोहन बोरकर, शीतल महांगडे,जयश्री रासकर, भोसले सर, रंजना शिंदे, पवन धायगुडे, किरण मोरे,संदीप ननावरे यांना विशेष कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

सर्व कवींना महावस्त्र व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विलास वरे यांनी करून मुजरा सादर केला. आभार सुजन फाऊंडेशनचे अध्यक्ष अजित जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचे बहारदार व रंजक सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी, कथाकथनकार ज. तु. गारडे यांनी केले.

गुरुकुल विद्यालयातील विद्यार्थी यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून साहित्यिक ताराचंद्र आवळे व अजित जाधव यांनी पुस्तके भेट दिली.

यावेळी खंडाळा परिसरातील साहित्यिक,कवी, साहित्यप्रेमी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा खंडाळा, सुजन फाऊंडेशन व ग्रामस्वराज्य युवा सामाजिक संस्थाचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!