
सातारा : प्रमोद कोपर्डे यांचे पुस्तक प्रकाशन करताना प्रा. श्यामसुंदर मिरजकर, प्रा. एकनाथ पाटील, कोपर्डे, जोत्स्ना पाटील – शिंदे
स्थैर्य, 22 मार्च, सातारा : कवी समाजाला दिशा व धोक्याची जाणीव देत असतो. सध्याचा काळ सत्य सांगण्यासाठी अजिबात अनुकूल नाही, असे मत प्रसिद्ध कवी प्रा. एकनाथ पाटील यांनी व्यक्त केले.
जागतिक कविता दिना निमित्ताने प्रमोद मनोहर कोपर्डे प्रतिष्ठानच्या वतीने नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. विचारमंचावर प्रतिष्ठानच्या विश्वस्त जोत्स्ना पाटील- शिंदे,साहित्यिक प्रा. डॉ.श्यामसुंदर मिरजकर, उपस्थित होते. याप्रसंगी आयोजित केलेल्या काव्यसंध्या कार्यक्रमात प्रा. एकनाथ पाटील व प्रा. श्यामसुंदर मिरजकर यांनी आपल्या कवितेचा प्रवास कथन केला व महत्त्वाच्या कविता सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले .
हिंदी कवी नरेश सक्सेना (लखनऊ – उत्तर प्रदेश) यांच्या ‘एक अनाम पत्तिका स्मारक ‘ या नवीन कवितासंग्रहाचे ‘ एका अनाम पानाचं स्मारक ‘ असे मराठी भाषे मध्ये ज्येष्ठ कवी प्रमोद कोपर्डे यांनी अनुवादित केलेल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन या समारंभात पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले .
प्रा. एकनाथ पाटील म्हणाले, ज्येष्ठ कवी प्रमोद कोपर्डे यांचे प्रतिष्ठानच्या वतीने ठाम भूमिका घेऊन साने गुरुजी यांची करुणा आणि संत तुकाराम यांच्या विद्रोहाचे बीज रुजवण्याचे धारिष्ट्याचे काम अतिशय मोलाचे आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ कवी प्रमोद मनोहर कोपर्डे म्हणाले, कविता हा प्रखर आत्मनिष्ठ साहित्याचा प्रकार आहे. कवी सत्याचा शोध घेत असतो. त्याला शब्दाचे भान असावे लागते. उत्सवी गेय कवितेने साहित्याच्या क्षेत्रात बाजार मांडला आहे. त्यामुळे समाजासमोर कविता पोहोचण्या ऐवजी कवींचे मिरवणेच केवळ जात आहे. उत्तर भारतातील वेगळी प्रतिमा असलेल्या कवी नरेश सक्सेना यांनी माणूस आणि निसर्गाचा जन्मापासून मरणा पर्यंतचा ऋणानुबंध नीट समजून घेतला.माणूस निसर्गाचीच निर्मिती आहे आणि त्यातच तो शेवटी परत जाणार आहे. हे तो विसरलाय आणि त्यानंच निसर्गाचा जास्त नाश केला आहे हे समजून घेऊन हिंदी साहित्यात आपल्या कवितेत त्यांनी ते प्रभावीपणे मांडले आहे. त्यांच्या समकालीन सामाजिक जाणवेच्या,निसर्गासंबंधीच्या कवितांनी मला झपाटून टाकले,अस्वस्थ केल्याने त्यांचा अनुवाद मराठीत केला.अशी कविता मराठीत लिहिली जात नाही म्हणून ती मराठीत आणणं आवश्यक वाटलं. या अनुवादाने आपल्याला समाधान व अपूर्व असाआनंद मिळाला आहे.
या समारंभास प्राचार्य डॉ.महेश गायकवाड,ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ, दिनकर झिंब्रे, कवी,रंगकर्मी चंद्रकांत कांबीरे, लेखक जयवंत भिसे, नारायण जावलीकर, मुकुंद व अस्मिता बहाळकर, प्रा. विश्वनाथ जाधव,यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व रसिक श्रोते उपस्थित होते. सविता कारंजकर यांनी उत्तम सूत्रसंचालन केले व आभार मानले.
