दैनिक स्थैर्य । दि. ०५ डिसेंबर २०२२ । सातारा । येथील रयत शिक्षण संस्थेच्या जयसिंगराव मल्हारी कर्पे विद्यालयात ‘वृद्धामृत कवितासंग्रह लिहिणारे अमृतवाडी येथील कवी शशिकांत पार्टे यांनी ‘वाचन संस्कृती’ रुजविण्याच्या हेतूने काव्यवाचन केले. सुरवातीस त्यांनी रयत शिक्षण संस्था ,कर्मवीर व लक्ष्मीबाई पाटील यांच्या त्यागामुळेच ग्रामीण समाजात शिक्षणाचा प्रसार होऊन आज अनेक पिढ्या घडल्या असल्याचे सांगितले.वाचनाबद्दल बोलताना ते म्हणाले ‘’ वाचन केल्याने विविध क्षेत्रातील ज्ञान आपल्याला मिळते आणि त्याच्या आधारावर आपल्या जीवनातले अनेक प्रश्न आपण सोडवू शकतो. लहान मुलांना आई वडिलांनी ग्रंथ भेट दिली पाहिजे म्हणजे मग त्यांचा चांगला वारसा सगळ्या समाजाला उपयोगी ठरेल. त्यांनी ऋषी मुनी पासून ज्ञान घेण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले. संत ज्ञानेश्वर ,तुकाराम ,नामदेव ,जनाबाई यांचे अभंग ओव्यातून भक्ती बरोबर सदाचरणी राहिले पाहिजे हा संस्कार झाला.माझ्यावर संत व समाज सुधारक यांचे संस्कार झाले. ग्रामीण भागात जीवन दर्शन घेत अनेक अनुभव मिळाले.त्यातूनच सुचत गेले. जे सुचले तेच मी लिहिले आहे. म्हातारे म्हातारे म्हणून म्हाताऱ्या माणसाना न हिंणविता त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्याला होत असतो. म्हातारे हे आकाशातले तारे असतात ते अनुभवातून ज्ञान प्रकाश देत असतात.’’असे सांगून त्यांनी वृद्धामृत कवितासंग्रहातील ‘वाचाल तर वाचाल ‘ तुमचं आमचं जमलं’ ‘सागर सरिता’ गुरु ज्ञान ‘ ‘आमची रयत शिक्षण संस्था ‘ कचरा ‘ शूरवीर कामिनी व तवा माणसं माणसात होती या कवितांचे सादरीकरण केले.कवी शशिकांत पार्टे यांनी विद्यालयाच्या वाचनालयासाठी आपले २ काव्यसंग्रह मुख्याध्यापक सुनिता वाघमारे यांचेकडे भेट दिले.
या वेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांना समाजात सायबर क्राईम कसे घडतात या विषयी पोलीस कॉन्स्टेबल जोत्स्ना मुंढे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.व आपल्याकडून कोणताही गुंन्हा घडणार नाही यासाठी विद्यार्थ्यांना सजग केले तसेच सावध केले. या काव्यवाचन व जागृती कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.वासंती जाधव यांनी केले. तर आभार सौ.प्रज्ञा धनावडे यांनी मानले.या कार्यक्रमास विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.