
दैनिक स्थैर्य । दि. २१ जुलै २०२२ । पाचवड । ‘ का कोकलता आम्हाला म्हातारे ,म्हातारे ,आम्ही तर आहोत पृथ्वीवरील तारे ‘ अशी कविता लिहिणारे साताऱ्याजवळील पाचवड परिसरातील अमृतवाडी गावचे, तरुणाचा उत्साह असलेले,आणि ‘वृद्धामृत’ या कवितासंग्रहातून अनुभवातून ज्ञान देणारी कविता लिहिणारे कवी शशिकांत केशव पार्टे यांनी ‘यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेस दहा हजार एकशे एक रुपयांची देणगी आस्थेने दिली. यशोधन ट्रस्ट ही संस्था ही अनाथ, बेघर,वयोवृद्ध ,मनोरुग्ण ,लोकांना ‘निवारा ‘मिळवून देऊन त्यांना सांभाळण्याचे काम करते. त्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी ,त्यांना औषधोपचार करण्यासाठी देणगीचा उपयोग केला जातो. वाई तालुक्यातील वेळे येथे,सोळशी रोडवर’निवारा’ हे केंद्र यशोधन संस्थेने उभे केले आहे .या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवी बोडके असून त्यांनी संस्थेस देणगी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सेवानिवृत्त झाल्यानतर मिळणाऱ्या पेन्शनवर उदरनिर्वाह करणाऱ्या आणि सदाचाराचे संस्कार कवितेतून देणाऱ्या शशिकांत पार्टे यांची सामाजिक जाणीव अनेकांना प्रेरणा देणारी आहे. पैशाचा उपयोग केवळ वैयक्तिक आयुष्य चंगळवादी जगण्यासाठी न करता आपल्या संसारात काटकसर करून ,नीतीने जगुन विधायक सामाजिक कार्यास फुल न फुलाची पाकळी तरी दान करावी हा धडा त्यांनी अनेकदा घालून दिला आहे.समाजासाठी चांगले काम करणाऱ्या संस्थेस सत्पात्री दान केल्याने समाजाचे हित होत असते ही जाणीव ठेवून स्वप्रेरणेने देणगी देणाऱ्या कवी शशिकांत पार्टे यांना अशा गोष्टीने समाधान होते ही भावना त्यांच्या बोलण्यातून जाणवली. यावेळी यशोधन ट्रस्टचे अध्यक्ष रवी बोडके ,वेळे गावचे सरपंच रफिक इनामदार ,उप सरपंच नलावडे, वेळे हायस्कूलचे श्री.जाधव सर तसेच प्राचार्य यादवसर इत्यादी उपस्थित होते.