
‘संविधानाच्या स्वप्नातल गाव’ हा डॉ. सुभाष वाघमारे यांचा कविता संग्रह साहित्य विश्व प्रकाशन पुणे यांनी जून २०२१ मध्ये प्रकाशित केलेला आहे. हा त्यांचा पहिलाच कवितासंग्रह असून या कवितासंग्रहातील कवितातून कवीने भारतीय संविधानाची काव्यात्मक नाळ स्वप्नातील गाव मातीशी जुळवून देशासह विश्वाचा सांस्कृतिक नकाशा सुख समृद्धीने संपन्न करण्याचा ध्येयवाद कवी सुभाष वाघमारे यांनी काळजात जपला आहे.
ज्यांनी मानव जातीच्या काळजात करूणा पेरली डोळ्याला प्रज्ञाचे तेच दिले आणि या दोहोंना सुंदर शील दिले त्या तथागत गौतम बुद्धाच्या कल्याणकारी विचाराचा वारसा जोपासणाऱ्या राजेशाहीचा तसेच संत आणि समाज सुधारकापासून तर आपल्या जन्मदात्री पर्यंत अर्पण पत्रिकेत उल्लेख करून आपल्या आदर्शाप्रति कविने कृतज्ञता भाव व्यक्त केला आहे.
भारतीय संविधानात जन्माच्या अर्थापासून तर जगण्यातील अर्थ याबद्दल सविस्तर ज्ञान समाविष्ट आहे. भारतीय संविधान जगण्यातील आर्त स्वराचा दहा शांत करते. भारतीय संविधान हे देशातील प्रत्येक नागरिकाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाची हमी देते. भारतीय संविधान देशाचा पाया आहे. या संविधानानेच आम्हाला आपल्या इच्छेनुसार धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. संविधानाच्या स्वप्नातल गाव विश्वापर्यंतच्या मानवी संस्कृतीचा कैवार पेलून नेते. कवी पुढे म्हणतो –
अल्लाहू अकबर पहाटे नमाज पढती
ज्ञानदेवांचा हरिपाठ …देहूकर वाचती़
गाव ज्ञानेश्वरांचा हरिपाठ वाचते आणि अल्लाहू अकबर ची पहाटेची नमाज देखील अनुभवते. विठोबाच्या देवळात अभंग दंग झालेला वारकरी कवीच्या आत्मियतेचा विषय आहे. परंतु या गावातील स्वैर वर्तनाच्या अनुभवाने कवी वैतागतो. माणसाची नाती असणाऱ्या गावात जातीपातीची विषमता दैववादी अंधश्रद्धा याबद्दल समिश्र भावना व्यक्त करताना कवी म्हणतो-
अशा गावाला जाताना…मनी काहूर उठते
कधी दांडगाई पाहून…मन विटते विकते..
एक इच्छा माझी…दैववाद जावा निघून
अंधारल्या गावात, पडावं समतेचे ऊन
अशा या संविधानाच्या गावात लोकशाही नांदावी कारण लोकशाही ही सर्वच प्रकारच्या विषमतेला मानवी जीवनातून बात करते. ती समतेचं सौंदर्य पुरविणारी पर्यायी समाज रचनेची भूमिका घेते. लोकशाही सर्वसामान्य माणसांच्या जीवनात समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय अंथरत असते. गाव कुणाचं या कवितेत कवी पुढे म्हणतो-
तुला गाव आवडतं
तुझ्या वाड्याची सत्ता परंपरेने राहावी म्हणून मला गाव
आवडतं कितीतरी दिवसाची घराणेशाही जावी
आणि गावात लोकशाही, समता यावी म्हणून
सत्ता ही एकाच्याच हाती राहत असेल तर तेथे लोकशाही नसून घराणे शाही असते. ही घराणेशाही नाहीशी व्हावी आणि खऱ्या अर्थाने लोकशाही नांदावी असे वाटत असेल तर समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय म्हणजेच लोकशाही होय. लोकशाहीचे महान उपासक विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या 22 डिसेंबर 1952 च्या भाषणात लोकशाहीची व्याख्या करताना म्हणतात की, "रक्ताचा एक थेंबही न सांडता लोकांच्या (जनतेच्या) सामाजिक आणि आर्थिक जीवनात आमुलाग्र परिवर्तन करणारी शासन सत्ता म्हणजे लोकशाही होय.
अर्थात ही कितीतरी दिवसाची घराणेशाही जाऊन गावात समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाची लोकशाही यावी असे येथे कवीला वाटते. भारताच्या मातीला सहिष्णुतेचा अत्तरगंध आहे. भारताच्या भूमीनेच विश्वाला शांतीचा संदेश दिलेला आहे. तथागत गौतम बुद्धाच्या काळापासूनच या देशाच्या लोकशाहीला सहिष्णुतेचा स्पर्श झाल्यानेच लोकशाहीची आधुनिक मूल्ये व व्यवस्था या देशात परकी वाटली नाही. समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायाचे अधिष्ठान लाभलेल्या या देशातील लोकशाहीत मानवता महत्त्वाची मानल्या गेली आहे. कवी आपल्या ध्योतक या कवितेत पुढे म्हणतो-
विश्वशांतीचे द्योतक आम्ही पुजूया मानवतेला
धर्म जात ना पंथ, इथे तर शांतीचा चेला
गुरु नसे, इथे शिष्य नसे कोणी, सगळेच भाऊ
एकजुटीने, एक विचारी, बंधुत्वाने राहू
सामाजिक जाणिवेची कविता लिहिली जाण्यासाठी कविचेचं समाजाशी नाते असायला हवे. तरच समाज आणि कवितेचं नातं पूरक ठरू शकते. कवी सुभाष वाघमारे यांची समाजाशी नाळ कायम टिकून असल्याने समाजातील व्यवहाराच्या अस्वस्थतेने त्यांना कधी कधी झोप लागत नाही. समाजात वावरतांना काही लोकात भरून असणारी पराकोटीची कावेबाज वृत्ती, सत्तेसाठी राजकारणी लोकांच्या वेगवेगळ्या तऱ्हा अशावेळेस कर्तव्य आणि माणुसकीला पारखे झालेले लोकं यामुळे कवीला झोप लागत नाही. म्हणून 'तोपर्यंत झोप लागत नाही या आपल्या कवितेत कवी पुढे म्हणतो-
जोपर्यंत समतेचा रस्ता रुंदावत नाही
जीवा तोपर्यंत झोप काही लागत नाही
त्यांची ती कावेबाज परंपरा
सत्तेसाठी नाना रंगाच्या त-हा
संविधान उत्सव गावात साजरा
माणूस माणूस कर्तव्याला जागत नाही
जीवा तोपर्यंत झोप काही लागत नाही
वर्तमान सर्वसामान्यांना अंधश्रद्धेच्या खाईत ढकलत आहे. विज्ञान युगातही अंधश्रद्धा आपले पाय खोलवर पसरत आहे. धर्मांधतेचा व्यापार करणारे दलाल आजही समाजात कधी आंब्याच्या तर कधी मोराचे अश्रू पिल्याने मोरनी गर्भधारणा करते अशी विज्ञानाला आव्हान करणारी आपली केविलवाणी अक्कल पाजळताना आपल्याला समाजात दिसून येत आहेत. अंधश्रद्धेचा व्यापार करणाऱ्या दलालांना काळ अनुकूल आहे. म्हणून अंधश्रद्धेतील परंपरेच्या लाटा त्यांना सोयीच्या वाटतात. त्यामुळे देव देवसकी करण्यात कसा वेळ जातो ते कळत नाही. म्हणून आपल्या अंधश्रद्धेचे सुख या कवितेत कवी म्हणतो-
लाभले आम्हास अंधश्रद्धेचे सुख
विचारांचे बुक ……..नको आता
कशाला हव्यात …..विज्ञानाच्या वाटा
परंपरेच्या लाटा सोयीच्या
कविता म्हणजे स्वतःशी चालवलेला संवाद, कधी संवादी तर कधी विसंवादी. तो जितका प्रामाणिक असतो तितकीच कविता पारदर्शी असते. कवितेचा तो स्वर स्वतःशी प्रामाणिकपणे राहावा यासाठी कवीला अनेकदा बऱ्यापैकी किंमत मोजावी लागते. समाजाच्या सुखदुःखाशी त्यांचं नातं एकरूप असावं लागतं. वरवरच्या अनुभवावर सकस निर्मिती होताना दिसत नाही. आपल्या कवितेतून विचाराचा एक अंतस्थ स्त्रोत कवितेच्या मुळाशी आला असेल तर कविता जिवंत होते. आपल्या मळवली या गावाचे कवी सुंदर असे जिवंत चित्र रेखाटताना गाव माझं या कवितेत म्हणतो-
गाव माझं मळवली, दोन्ही माळांच्या गळ्यात
सात पीर बसले, साहेब होऊनी गळ्यात
दक्षिणेस गांव ओढा, पाय पसरून वाहतो
पाणी नितळ नितळ, साऱ्या मळ्यांना पाजतो
अनुभवाचा वाढता परिघ कवितेच्या कक्षा रुंदावतो. स्वानुभव भवतालची व्याख्या बदलते. दुसऱ्याच्या अनुभवाकडे सजगतेने पाहता येते. संवेदना प्रसरण पावते. बाह्य अनुभवाची तादात्म्य पावून कवितेला नवी दृष्टी देण्याचे काम डॉ. सुभाष वाघमारे सारखा एक कवी, एक शिक्षक करीत असतो. प्राध्यापक डॉ. सुभाष वाघमारे यांच्या तुझ्या कविता नि माझी समीक्षा या कवितेतील अंतरंगातले उमाळे, उसासे आणि विरहभावना व्यक्त करतांना कवितेतील नायिका बोलते.
घेऊन आशावाद नवा जगणे तू जगावे
होकारातल्या नकारांना पुन्हा होकार बनवावे
देशात सर्व जाती जमातीचे लोकं राहात असले तरी आपल्या घटनेने मात्र एकाच धर्माचा स्वीकार केलेला नाही. म्हणूनच देशात लोकशाहीला सुरुंग लावण्याच्या घटना घडत आहेत. परंतु या घटना घडविल्या जात असल्या तरी लोकशाही शाबूत आहे. भारत हा राज्यांचा संघ असून येथे अनेक धर्मांचे लोकं राहतात. या देशात वेगवेगळ्या धर्माचे आचरण करणारे लोकं असले तरी याबाबतीत लोकांचे वर्तन हे निधर्मीपणाचेच असावे. या गावातील लोकांना ज्ञानोपासनेने समजूतदारपणा येवून असत्यभाषण, व्यभिचार,चोरी यांच्यापासून परावृत्ती आणि गावातील प्रत्येकाच्या मनात मानवाप्रति अखिल मानव जातीसंबंधी प्रेमभावना निर्माण व्हावी. अर्थात प्रज्ञा, शील, करुणा असेल तर अन्यायाचा शेवट करता येईल. आणि हे सर्व संविधानाच्या तत्त्वानुसार शक्य आहे. म्हणून कवी आपल्या 'संविधानासारखे आता माझे गांव होवो या कवितेत कवी म्हणतो –
धर्म असूनी धर्मनिरपेक्ष व्हावे माझे गांव
प्रज्ञा शील करुणा यावी संपावा अन्याय
संविधानाच्या रस्त्याने चालत जाऊ याहो
संविधानासारखा आता माझा गांव होवो
कवी सुभाष वाघमारे यांच्या कवितेची दुःखमुक्त आणि विषमता मुक्त मानवतेची व्यापक आणि उदात्त भूमिका ही या आणि इतरही कवितेतून व्यक्त होताना दिसते. एकूणच प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची कविता मला उर्जेचे प्रतिक असणारे काव्य आहे.निराश मनाला धीर देऊन आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला हिम्मत करावी वाढवावी लागते,आणि धीर देऊन समाजातील विसंगतीं उघड्या करीत पुढचे पाउल टाकावे लागते असे सांगणारी ही कविता प्रत्येक मनाला चेतना व प्रेरणा देणारी आहे.