दैनिक स्थैर्य । दि. २६ जून २०२३ । भोपाळ । विदेश दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार होते. या दौऱ्यात मोदी भोपाळमधील मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ अभियानांतर्गत देशभरातील निवडक ३ हजार बुथ कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार होते. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनींनी खास मध्य प्रदेशचीच निवड का केली. मात्र, कार्यक्रमाची तयारी झाली असताना मोदींचा हा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोदींचा दौरा रद्द झाल्याचे सांगितले. तसेच, पुढील तारीख कळवण्यात येईल, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. स्वत: मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मोतीलाल नेहरु स्टेडियमवरुन जाऊन पाहणीही केली होती. मात्र, त्यानंतर काही वेळातच त्यांनी हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समाजमाध्यमातून दिली. उद्या २७ जून रोजी मोठ्या पावसाची शक्यता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लालपूर आणि पकरिया येथील तात्पुरत्या स्वरुपात कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. या नियोजित दौऱ्याची पुढील तारीख लवकरच कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना कळवण्यात येईल, असेही मुख्यमंत्री चौहान यांनी सांगितले.
म्हणून मध्य प्रदेशची निवड
मध्य प्रदेशमधील भाजपाच्या बूथ मॅनेजमेंटने आपल्या कार्याची अनेकदा चुणूक दाखवली आहे. हल्लीच व्ही.डी. शर्मा यांच्या नेतृत्वाखाली बूथ विस्तार अभियानामध्ये ऐतिहासिक यश मिळवलं होतं. त्याचं कौतुक केंद्रीय नेतृत्वानेही केलं होतं. तर, मध्य प्रदेश भाजपाने गेल्या काही दिवसांपूर्वी बूथ विस्तारक अभियानांतर्गत ६४ हजार बूथवरील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह आणि नवी उर्जा निर्माण करण्याचं काम केलं. तसेच त्यांना पूर्णपणे डिजिटलाइज्ड करण्याचंही काम केलं. त्यामधून बूथवरील एक पदाधिकारी आणि अर्थ पन्ना प्रमुखाला एका अॅपच्या माध्यमातून जोडण्यात आले. त्यांची माहिती साठवण्यात आली. त्यामुळे दिल्लीतील कार्यालयातील कुठलीही व्यक्ती त्या माहितीच्या माध्यमातून त्यांच्याशी चर्चा करू शकते. म्हणून मोदींनी या कार्यक्रमासाठी मध्य प्रदेशचीच निवड केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम राज्यातील अधिकाधिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेला पाहता यावा यासाठी मध्य प्रदेश भाजपाकडून व्यवस्था करण्यात येते. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सुमारे ९० टक्क्यांहून अधिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य जनता मन की बात कार्यक्रम ऐकते. या कारणांमुळेच मोदींनी बूथ अभियानासाठी मध्य प्रदेशची निवड केली आहे.