स्थैर्य, बलरामपूर, दि. 23 (वृत्तसंस्था) : आयसिस या दहशतवादी संघटनेच्या संशयित अतिरेक्याच्या घरावर छापेमारी केली. उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये छापेमारी केली असून, मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि सुसाइड बॉम्बर जॅकेट हस्तगत केला आहे. दिल्लीच्या धौलाकुआं येथून आयसिसच्या संशयित अतिरेक्याला अटक करण्यात आली होती. अबू युसूफ असे या संशयिताचे नाव असून, तो मूळचा बलरामपूरचा रहिवासी आहे.
अबू युसूफला दिल्लीत अटक करण्यात आली होती. हल्ल्याच्या योजना आखण्यात यशस्वी झाल्यानंतर सुसाइड बॉम्बर बनून हल्ल्याची तयारी केली होती, अशी कबुली त्याने दिली होती. सुसाइड बॉम्बर जॅकेट तयार केला असल्याची माहितीही त्याने दिली होती. आज केलेल्या छापेमारीत त्याचा पुरावाच अधिकार्यांच्या हाती लागला. छापेमारीत मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि सुसाइड बॉम्बर जॅकेटही सापडले.
अबू युसूफ हा मूळचा उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील उतरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भैंसाही गावचा रहिवासी आहे. गावात त्याचे कॉस्मेटिकचे दुकान आहे. त्याचे कुटुंबीय याच गावात राहतात, अशी माहिती मिळते.
मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, अबू युसूफची पत्नी
दरम्यान आपल्या नवर्याने घरामध्ये गन पावडर आणि अन्य स्फोटके बनवण्याचे साहित्य जमा करून ठेवले होते, असे अबू युसूफच्या पत्नीने सांगितले.
तुम्ही जे करताय ते योग्य नाही. जेव्हा मी नवर्याला स्फोटके बनवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने तू मला रोखू शकत नाहीस, असे उत्तर दिले. त्याला माफी मिळेल, अशी मला अपेक्षा आहे. मला चार मुले आहेत. मी कुठे जाऊ?, असे अबू युसूफच्या पत्नीने म्हटले आहे.
तो या वाटेवर जाईल याची कल्पनाही केली नव्हती : अहमद
माझा मुलगा खूप चांगला माणूस आहे. त्याचे कोणाबरोबरही भांडण नव्हते. त्यामुळे तो दहशतवादाच्या मार्गावर जाईल याची कधी कल्पनाही केली नव्हती, असे अबू युसूफचे वडील काफील अहमद एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले.
अबू युसूफच्या दहशतवादी कटाबद्दल काही माहीत होते का, या प्रश्नावर त्याचे वडील म्हणाले, स्फोटक साहित्याबद्दल मी काही ऐकले नव्हते. त्याने स्फोटक साहित्याची जमवाजमव केल्याची मला कल्पना असती, तर मी अबू युसूफला कधीही माझ्या घरात राहू दिले नसते. पीटीआयने हे वृत्त दिले आहे. पोलीस सायंकाळी घरी आले. त्यांनी ते साहित्य शोधून काढल्यानंतर नेमकं ते काय होतं ते मला समजलं, असे काफील अहमद यांचे म्हणणे आहे.