स्थैर्य, सातारा, दि.०३: शिक्षणाबरोबरच विविध क्रीडाप्रकारात पारंगत असणाऱ्या विध्यार्थ्यांना भविष्यात करियरच्या चांगल्या संधी आहेत. खेळाडूंच्या चमकदार कामगिरीत सातत्य असणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि म्हणून खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप पडणे आवश्यक आहे, असे मत आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.
आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्रसमूह आणि निरंजन कदम मित्रसमूहाच्या वतीने आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत खेळाडू गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात मधुरा ननावरे (कुस्ती), मृदुला पुरीगोसावी (जलतरण), आरव मोरे (मल्लखांब), आयुष मोकाशी (बॉक्सिंग), साईराज काटे (नेमबाजी), उमेश चव्हाण (शरीर सौष्ठव) आदी गुणवंत खेळाडूंचा सत्कार आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्रसमूहाचे अध्यक्ष फिरोज पठाण, उपाध्यक्ष निरंजन कदम, विलासपूरचे उपसरपंच अभय जगताप, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील, सचिन पाटील, जितेंद्र कदम, रोहन घोरपडे, धीरज डिसले, शंकर भोसले, ऋषिकेश जांभळे आदी उपस्थित होते.
विविध क्रीडाप्रकारात अनेक खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत तसेच खेळाडूंनीही कष्ट, जिद्द आणि चिकाटी वृत्ती अंगीकारून सरावामध्ये सातत्य ठेवले पाहिजे. तरच खेळाडू यशाचे शिखर गाठेल. निरंजन कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुणवंत खेळाडूंचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम केले असून हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.