समर्थगाव येथे प्लास्टिक रिसायकलिंग कंपनीस भीषण आग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.०७ फेब्रुवारी २०२२ । सातारा । समर्थगाव (अतीत) ता. सातारा येथे भंगारातील प्लास्टिकचे रिसायकलिंग करणाऱ्या कंपनीस रविवारी दुपारी भीषण आग लागली. सुदैवाने कामगारांना सुट्टी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दलाच्या चार गाड्यांनी रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र आगीने रौद्ररूप घेतल्याने कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

ग्वाल्हेर-बेंगलोर आशियाई महामार्गावरील निसराळे फाटा येथून पाली- सासपडे-तारळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर समर्थगाव (अतीत) गावच्या हद्दीत डोंगराच्या पायथ्याला अमेझिया व्हिजन इन्व्हायरमेंटल प्रा.ली. ही कंपनी आहे.या कंपनीत भंगारातील प्लास्टिकवर रिसायकलिंग करण्याचा प्लान्ट आहे. रविवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास या कंपनीस मोठी आग लागली.रविवार कामगारांना सुट्टी असल्याने कंपनीत कोणीही न्हवते.त्यामुळे आग लागलेली लवकर लक्षात आली नाही.
वाऱ्यामुळे आगीने तात्काळ रौद्ररूप धारण केले. धुरांचे लोट सुमारे १५ किलोमीटरच्या परिघात लांबुन दिसत होते. घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलिस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर, सहाय्यक फौजदार डी. डी. कारळे, हवालदार हणमंत सावंत, प्रकाश वाघ, किरण निकम, राजू माने, सत्यम थोरात, चालक धनंजय जाधव तसेच उंब्रज पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सातारा नगरपालिका, कराड नगरपालिका, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना व जयवंत शुगरच्या अग्निशामक दलाच्या गाड्याही तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.
सायंकाळी उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू होते. या आगीत प्लास्टिकच्या कच्च्या मालाबरोबरच तयार माल व यंत्रसामुग्रीसह कंपनीचे संपूर्ण मेन शेड आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात कंपनीचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.

महिला कामगारांना अश्रू अनावर..
या कंपनीत परिसरातील स्थानिक लोक कामाला होते. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. रविवार हा आठवडा सुट्टीचा दिवस असल्याने सर्व कामगार सुट्टीवर होते. मात्र, सायंकाळी कंपनीला आग लागल्याचे समजताच महिला-कामगारांसह कर्मचाऱ्यांनी कंपनीकडे धाव घेतली. आगीचे रौद्ररूप पाहून महिला कामगार हतबल झाल्या. ज्या कंपनीच्या जीवावर त्यांच्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह होत होता. ती कंपनी आगीत भस्मसात होत असल्याचे पाहून महिला कामगारांना अश्रू अनावर झाले होते.


Back to top button
Don`t copy text!