दैनिक स्थैर्य | दि. १४ ऑगस्ट २०२३ | फलटण |
भारत देश आज जगात सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. देशाने अनेक क्षेत्रांत प्रगती केली आहे. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ज्ञात-अज्ञात देशवासियांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या त्यागामुळेच स्वातंत्र्याची पहाट उगवली. आज देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होत असतानाच त्यांच्या या त्यागाचे स्मरण करणे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या ‘मेरी माटी, मेरा देश’ या अभियानाच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, सर्वस्व गमावलेल्या, बलिदान दिलेल्या त्या सर्व ज्ञात, अज्ञात देशवीरांप्रती नतमस्तक होण्याची, अभिवादन करण्याची संधी आपल्या प्रत्येकाला मिळाली आहे, असे मत मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देता त्यापासून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्यासाठी प्रत्येक भारतीयाला प्रेरित करणारा हा उपक्रम आहे. या अभियानाचा शुभारंभ, दि. ९ ऑगस्ट म्हणजे ‘क्रांतीदिनी’ करण्यात आला आहे. संपूर्ण देशात, संपूर्ण राज्यात एकाच कालावधीत हे अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत शिलाफलक, वसुधा चंदन, स्वातंत्र्यसैनिक, वीरांना वंदन, पंच प्रण (शपथ घेणे), ध्वजारोहण व राष्ट्रगान अशा पाच उपक्रमांतून क्रांतिकारक व आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले असून शहीद वीरांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान राबविण्यात येत आहे.
ज्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्राणांची आहुती दिली, त्यांचे स्मरण करण्याचा हा उपक्रम आहे. ज्यांनी मिळालेले स्वातंत्र्य अखंड, अबाधित ठेवण्यासाठी प्राण खर्चिले, त्यांना सलाम, वंदन, प्रणाम करण्याचा, त्यांच्याप्रती नतमस्तक होण्याचा हा उपक्रम आहे. त्याचबरोबर भावी पिढीमध्ये देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी या माध्यमातून देशभक्तीचा जागर करण्यात येणार आहे.
आज फलटण नगरपरिषदेच्या आवारात शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी फलटण तालुक्यातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान दिले अशा थोर व्यक्तींची नावे निश्चित करून शिलाफलकाची उभारणी करण्यात आली आहे.