श्रीमंत रामराजेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोळकी गणात पाच हजार वृक्ष लागवड; पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे यांची संकल्पना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 02 ऑक्टोबर 2021 । फलटण । जागतिक तापमानवाढ मोठी समस्या आहे. त्यामुळे आज अतिवृष्टी, महापूर, भूकंप यासारख्या आपत्तींना सर्व जग सामोरे जात आहे. यामुळे भविष्यामध्ये अनेक नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागणार आहे. मानवी जीवन धोक्यात येऊ नये यासाठी वेळीच खबरदारी घेतली पाहिजे. वातावरणीय बदलाचे परिणाम आता आपण प्रत्यक्ष अनुभवू लागलो आहोत. यामुळे हा विषय अतिशय महत्त्वाचा असून हे बदल रोखण्यासाठी उपाययोजना राबविताना लोकसहभाग अत्यंत गरजेचा असून लोकप्रतिनिधींनी देखील हा विषय समजून घ्यावा आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी काही दिवसापूर्वीच केलेले होते. त्याला प्रतिसाद देत फलटण तालुक्यातील कोळकी पंचायत समिती गणामध्ये पंचायत समिती सदस्य यांनी स्वखर्चातून पाच हजार विविध झाडांचे वृक्षारोपण केलेले आहे.

सध्याची परिस्थिती पाहता वातावरणीय बदल या विषयाचे गांभीर्य प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. जागतिक तापमानवाढ या विषयासंदर्भात लोकप्रतिनिधींना ज्ञान मिळावे यासाठी त्यांना मार्गदर्शन गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनी देखील हा विषय समजून घ्यावा आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावा. जागतिक तापमानवाढीबद्दल लोकप्रतिनिधींमध्ये जागरुकता व्हावी यासाठी विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्याची जबाबदारी घ्यावी असे आवाहन केलेले होते. त्याला प्रतिसाद देत फलटण तालुक्याच्या कोळकी पंचायत समिती गणामध्ये पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे यांनी देशी झाडे म्हणजेच करंज, चिंच, कवट, सीताफळ, लिंब, सिसू, वावळा, चिवण, गुलमोहर, नारळ यांच्यासह विविध वृक्षे हि स्वखर्चातून लागवडीचा निर्णय घेतलेला आहे. या सोबतच बिहार पॅटर्न प्रमाणे पंचायत समिती गणमधील संबंधित ग्रामपंचायतींनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी सुपूर्त करण्यात आलेली आहे.

विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शखाली कोळकी पंचायत गणामध्ये पाच हजार वृक्ष लागवडीचा व वृक्ष संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तातडीने वनविभागाच्या संयुक्त विद्यमातून कोळकी पंचायत समिती गणामधील कोळकी, भाडळी खु., भाडळी बु., झिरपवाडी, सोनवडी खु., तिरकवाडी या सर्व गावांमध्ये मिळून पाच हजार वृक्ष लागवड करण्याचा आमचा मानस आहे. त्यापैकी सुमारे तीन हजार हुन अधिक वृक्ष लागवड प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आगामी काही दिवसात शिल्लक वृक्ष लागवड प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे मत पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे यांनी व्यक्त केले.

सदर वृक्षलागवडीसाठी क्षेत्रीय वन अधिकारी मारुती निकम, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार, नियत क्षेत्र वनाधिकारी किरण जगदाळे, परिमंडळ वन अधिकारी राजेंद्र कुंभार यांच्यासह संबंधित गावच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे अनमोल सहकार्य लाभले असून आगामी काळामध्ये सदरील वृक्षारोपण केलेल्या वृक्षांची संवर्धनाची जबाबदारी हि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बिहार पॅटर्न नुसार करण्यात येणार आहे, असेही पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!