दैनिक स्थैर्य | दि. 04 जून 2023 | सातारा | अश्वमेध युवक नागरी सहकारी पतसंस्थेच्या कर्जदारांनी कर्जकालावधीत झाड लावून ते झाड जगवले, वाढवले, त्या झाडाचे संगोपन केले तर त्या कर्जदाराच्या कर्जव्याज दरात ०.५% सुट देण्यात येणार असल्याची माहीती अश्वमेध पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन व माजी सभापती रविंद्र भारती-झुटिंग यांनी दिली.
जागतिक तापमानात झालेली वाढ, दिवसेंदिवस निसर्गाचे ढासळत असलेले संतुलन आणि मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड यावर आपल्या परीने काहीतरी करावे. या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. अश्वमेध युवक नागरी सहकारी पतसंस्थेच्या कर्जदारांनी कर्ज घेतल्यावर झाड लावले व त्या झाडाचे योग्यरित्या संगोपन केले, तर त्या कर्जदाराला त्याच्या कर्ज व्याज दरात ०.५% सुट दिली जाणार आहे. त्यामुळे कर्जदाराला व्याजदारात सुट आणि झाड लावल्याचे समाधान असा दुहेरी लाभ होणार आहे.
याच बरोबर संस्थेचे संचालक, सल्लागार व कर्मचारी यांचे वाढदिवस देखील वृक्ष लावून साजरे केले जाणार आहेत. वाढदिवसाच्या सर्व खर्चांना फाटा देत हा खर्च वृक्षारोपणावर करण्यात येणार आहे. दरमहा एक वृक्ष लावून त्या वृक्षाचे संपूर्ण संगोपन करण्याची जबाबदारी पतसंस्था स्वीकारणार आहे. या दोन्ही योजना जागतिक पर्यावर दिना दिवशी म्हणजेच आजपासून सुरु करण्यात येत असल्याची माहीती रवींद्र भारती- झुटिंग यांनी दिली.
भविष्यात अशाच प्रकारची योजना ठेवीदारांच्यासाठीही राबविण्यात येणार असून जास्तीजास्त कर्जदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे व्हा. चेअरमन सुरेश माने व व्यवस्थापक संजय साबळे यांनी केले आहे.