दैनिक स्थैर्य । दि. ३० जून २०२१ । मुंबई । लातूर शहरातील भूमिगत वीजवाहिन्यांची कामे पाच वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन करावे, अशा स्पष्ट सूचना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या. लातूर जिल्ह्यातील ऊर्जा विभागाच्या कामांची आढावा बैठक वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीत ऊर्जामंत्र्यांनी वरील सूचना दिल्या.
मंत्रालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीस ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, ऊर्जा विभागाचे उपसचिव प्रशांत बडगेरी, एमएसईबी सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे, संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत, संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण मंत्रालयातून तर महापारेषणचे संचालक (प्रकल्प) व्ही. थंगपंडियन, औरंगाबाद विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक भुजंग खंदारे, लातूरचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आदी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
यावेळी मंत्री डॉ. राऊत आणि श्री. देशमुख यांनी लातूर जिल्ह्यातील रेणापूर, अति उच्च दाब (ईएचव्ही) उपकेंद्र, नवीन विद्युत उपकेंद्र (सबस्टेशन) उभारणी, नवीन रोहित्रांची कामे तसेच नादुरुस्त रोहित्रांच्या बदल्यात द्यायची रोहित्रे, औसा- रेणापूर सौरऊर्जा प्रकल्प उभारणी, लातूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी सौरऊर्जा प्रकल्पास मान्यता देणे आदी बाबींच्या अनुषंगाने या बैठकीत आढावा घेतला.
लातूर महानगरपालिकेच्या हद्दीत सध्या काही भागातच भूमिगत वीजवाहिन्यांची कामे झाली असून महानगरपालिकेच्या संपूर्ण हद्दीत ही कामे पूर्ण व्हावीत अशी मागणी मंत्री देशमुख यांनी डॉ. राऊत यांच्याकडे केली. त्या अनुषंगाने तात्काळ व्यवहार्यता तपासून आणि केंद्र शासनाच्या प्रस्तावित योजनांमध्ये समावेश ही कामे येत्या पाच वर्षात टप्प्याटप्प्यांतर्गत पूर्ण होतील असे नियोजन करावे, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हाती घ्यायची कामे पालकमंत्री तसेच लोकप्रतिनिधींनी सूचवल्याप्रमाणे प्राधान्यक्रमाने हाती घ्यावीत. याबाबत तक्रारी होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. नागरिकांच्या वीजपुरवठा, रोहित्रे आदींबाबतच्या तक्रारी अधिकाऱ्यांनी तातडीने सोडवाव्यात. लातूर जिल्ह्यात विद्युत रोहित्रे नादुरुस्त होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसत असून त्याची कारणे शोधून तात्काळ उपाययोजना कराव्यात, आदी निर्देश डॉ. राऊत यांनी दिले.
महानिर्मितीकडून शिंदाळा-लोहारा (ता. औसा) येथे उभारण्यात येणाऱ्या 60 मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्प उभारणीचाही आढावा यावेळी घेण्यात आला. या प्रकल्पासाठी साठी 174 हेक्टर जागा हस्तांतरित करण्यात आली असून प्रकल्पासाठी माती तपासणी, प्रकल्प आरेखन आदी तयार केले असून लवकरच प्रकल्पाचे सादरीकरण ऊर्जामंत्री डॉ. राऊत आणि पालकमंत्री श्री. देशमुख यांच्यासमोर करण्यात येईल. त्यानुसार प्रकल्प उभारणीला तात्काळ सुरूवात करण्यात येईल, अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. लातूर महानगरपालिकेच्या वीजेच्या थकबाकीच्या अनुषंगानेही बैठकीत चर्चा झाली.