
दैनिक स्थैर्य । दि. ७ मे २०२२ । सातारा । जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर नियोजन आवश्यक आहे. नियोजन करण्याची सवय लागली पाहिजे. स्थिर, ठामपणा, भावनावर नियंत्रण आणि प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवता आले पाहिजे. संकटांची भीती आपल्याला मारुन टाकते त्यामुळे स्वतःच्या भावभावनांचे नियोजन हाच यशाचा खरा पासवर्ड असल्याचे मत इतिहास अभ्यासक, सुप्रसिध्द वक्ते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी व्यक्त केले.
ते भाऊसाहेब सोमण स्मारक मंदिर, राजवाडा चौपाटी येथे कै. यशवंत कारखानीस व कै. शंकुतला कारखानीस स्मृत्यर्थ अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाच्या अभ्यासिकेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अरुण गोडबोले, सी.ए. विजयकुमार क्षीरसागर, अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाचे संस्थापक रवींद्र भारती-झुटीग, अध्यक्ष शशिभूषण जाधव, कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र माने आणि मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करुन अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर समर्थ सदन येथे कै.सौ.सुमित्रा नरसिंगराव क्षीरसागर स्मृत्यर्थ प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांचे ‘यशाचा पासवर्ड’ या विषयावर व्याख्यान झाले.
यावेळी बोलताना प्रा. पाटील यांनी अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाच्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांच्या या उपक्रमामुळे व्यासंग आणि संशोधन वृत्ती, वाचनसंस्कृती वाढण्यास मदत होईल. सोशल मिडियाच्या युगात अभ्यासिका ही संकल्पना महत्वाची असल्याचे सांगितले. पालक आणि विद्याथर्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी परिस्थिती ही माणसाला घडवते. संकटांना संधी मानले पाहिजे. पालकांनी मुलांना वारंवार तुम्ही हे करु नका, ते करु नका हे सांगण्यापेक्षा त्यांनी काय करावे हे सांगितले पाहिजे. जगात तुम्हीच तुमचा पराभव करु शकता किंवा तुम्हीच तुम्हाला जिंकू शकता हे सांगायला हवे. मुलांना जीवनानुभव देणे महत्वाचे आहे. अनुभव हाच मोठा गुरु आहे. मुलांचा नैसर्गिक कल ओळखून त्याप्रमाणे त्यांना ध्येय ठरवून देणे गरजेचे आहे. पालकांनी त्यांच्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादू नये, तसे केल्यास काय होते हे त्यांनी उदाहरणांसह सांगितले. शेतक-यांच्या आत्महत्येबरोबरच विद्याथर्यांची आत्महत्येकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. यावेळी त्यांनी यश म्हणजे नेमके काय ? हे उपस्थितांना उदाहरणांसह सांगितले. काय करावे हे कळत नसेल तर काय करु नये हे कळाले तरी ते सुध्दा महत्वाचे आहे. फुकटचं घ्यायचे नाही हा संस्कार मुलांवर करणे महत्वाचे आहे. संकटे, अडचण, अडथळे आल्याशिवाय माणूस घडत नाही, संकटाशिवाय क्षमता ओळखता येत नाही हे मुलांवर ठसवलं गेले पाहिजे. सर्वोच्च यश मिळवायचे असेल तर स्वतःला ओळखणे महत्वाचे असून त्याप्रमाणे लवकर सुरुवात होणे महत्वाचे आहे हेही त्यांनी श्री.छ. शिवाजी महाराज, सचिन तेंडुलकर यांचे उदाहरण देऊन सांगितले. यशस्विता तयार होण्यासाठी नियोजन हे अतिशय महत्वाचे आहे. विचार करण्यात आयुष्य घालवू नये, वेळ आणि संधी थांबून राहत नाही यासाठी नियोजन करुन निर्णय घेणे महत्वाचे आहे. यासाठी त्यांनी श्री.छ. शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांच उदाहरणे दिली. घेतलेला निर्णय योग्य होता हे जे सिध्द करतात ते यशस्वी होतात. निर्णय झाल्यावर मागेपुढे पहायचे नाही तसेच पर्यायही ठेवायचे नाहीत. पर्याय ठेवल्यास यश मिळत नाही. पालकांना एकदा पाल्याने एक विशिष्ट निर्णय घेतल्यानंतर त्याचे परतीचे दोर कापून टाकता आले पाहिजे तरच त्याचे कौशल्य, शक्ती एकवटून तो ध्येयापर्यंत पोहचले. यश मिळवण्यासाठी व्यवस्थापन, स्थिर आणि ठामपणा, भावनावर नियंत्रण आणि नियोजन मिळवता आले पाहिजे. आत्मविश्वासाचा अभाव हे अपयशाचे प्रमुख कारण आहे. प्रोत्साहन, प्रेरणा, बळ देणे हे पालकांचे काम आहे परंतु ते होते का हा चिंतनाचा विषय आहे. प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे हा यशाचा सर्वोत्तम मार्ग असून त्याचबरोबर संवेदनशीलता असणे ही गरजेचे आहे.
प्रारंभी संयोजकांच्यावतीने मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सोमवार पेठ येथील अभ्यासिकेमध्ये अभ्यास करुन यश मिळवलेले सी.ए. साजिद मुल्ला, शुभम साळुंखे आणि एम.पी.एस.सी. परीक्षेत यश मिळवलेल्या धनश्री निकम यांचा प्रा. बानुगडे-पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविकात रवींद्र भारती-झुटींग यांनी ही सुसज्ज आणि सर्वसोयीनियुक्त अभ्यासिका असून ना नफा, ना तोटा या तत्वावर चालणारी आहे. युवक-युवती प्रशासकीय सेवेत जावे हा उद्देश असून याठिकाणी कॉम्प्युटर, वाय-फाय, स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके उपलब्ध आहेत. यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यक अरुण गोडबोले यांनी भाऊसाहेब सोमण यांच्या कार्याची माहिती सांगत अश्वमेध ग्रंथालय आणि वाचनालयाचे कार्य बघून अभ्यासिकेसाठी जागा उपलब्ध करुन दिल्याचे सांगितले. अश्वमेधच्या उपक्रमास शुभेच्छा देत या अभ्यासिकेतून उत्तमोत्तम अधिकारी घडू अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र माने यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन वैदेही कुलकर्णी यांनी केले तर आभार सादिक खान यांनी मानले.
याप्रसंगी श्रीधर साळुंखे, बाळासाहेब शिंदे, सुजित शेख, सुनील इंगवले, श्रीकांत दीक्षित, पोपटराव मोरे, शेखर चव्हाण, सचिन तिरोडकर, योगेश कुलकर्णी, अमर बेंद्रे, साई पालकर, केदार खैर, निलेश पवार, अँड. शुभम तंटक, विश्वनाथ फरांदे, अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाचे पदाधिकारी, सदस्य, अश्वमेध पतसंस्थेचे संचालक, पदाधिकारी, सदस्य, वाचनप्रेमी सातारकर आणि विद्यार्थी, पालक मोठया संख्येने उपस्थित होते.