टाळेबंदीच्या काळाचा कोविड-19 विरोधात लढण्याची क्षमता वृद्धीसाठी वापर : एमएसएमईसाठी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर पॅकेजअंतर्गत व्यापारीही पत मिळवण्यास पात्र : आर्थिक घडामोडी वेग येण्यास प्रारंभ
स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 29 : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी वेगवेगळ्या व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर गुरूवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. या टाळेबंदीच्या कालावधीमध्ये संपूर्ण देशाने कोविड-19 महामारीविरुद्ध लढा देण्यासाठी आपल्या क्षमता कशा वाढवता येतील, याचा विचार करून, कार्यवाही केली. महामारीपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनसामुग्रीची देशांतर्गत निर्मिती करणा-या उद्योगांना (जसे की- मास्क, सॅनिटायझर्स, ग्लोव्ह्ज, पीपीई संच ) चालना मिळाली आहे. आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा अधिक विस्तारण्यात येत आहेत तसेच लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. कोविडमुळे आलेल्या अभूतपूर्व संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधानांनी सर्वांना एकजूटतेने काम करण्याचे आवाहन केले, त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि सर्वजण सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून या संकटाला तोंड देत आहेत. याच काळात आरोग्य सेतू विकसित करण्यात आले. सध्याच्या काळात हे अॅप म्हणजे संकटामध्ये वापरता येणारी ढाल आहे. तसेच हे अॅप आपला मित्र आणि संदेशवाहक म्हणून कार्य करीत आहे. लोकांनी आपल्या जीवनशैलीमध्ये परिवर्तन केले आहे आणि सद्यस्थितीचा विचार करून सगळेजण आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी करीत आहेत. पंतप्रधानांनी त्वरित आणि अतिशय योग्य निर्णय घेतल्यामुळे देशाला आणि सर्वांनाच अतिशय लाभ झाला आहे. इतर देशांबरोबर तुलना केली असता, तसेच आपल्याकडे असलेली मर्यादित साधन सामुग्री, आपली प्रचंड लोकसंख्या यांचा विचार करता देशाची स्थिती चांगली आहे, हे स्पष्ट होते.
टाळेबंदीच्या काळातल्या अटींमध्ये आता बरीचशी शिथिलता आणण्यात आली आहे. त्यानंतरही किरकोळ व्यापारी बांधवांना काही अडचणी येत आहेत, याविषयी बोलताना गोयल म्हणाले, आता दुकाने उघडण्यास परवानगी देताना आवश्यक किंवा अनावश्यक असा भेदभाव ठेवलेला नाही. मात्र शारीरिक अंतर ठेवणे, ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करणे अतिशय गरजेचे आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करून मॉल्समधली उर्वरित दुकाने सुरू करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. कोविड-19 च्याविरोधात लढा देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर पॅकेजमध्ये एमएसएमईसाठी तीन लाख कोटी रुपयांच्या पत हमी देण्यात आली आहे. त्यामध्ये व्यापारी वर्गाचाही समावेश आहे, असं यावेळी पीयूष गोयल यांनी सांगितले. आता ‘एमएसएमई’ची व्याख्या बदलण्यात आली आहे, त्याचाही लाभ एमएसएमई क्षेत्रातल्या अनेकांना होणार आहे. इतके उपाय योजूनही काहीजणांना जर समस्या असेल तर आपण त्यावर खुल्या मनाने विचार करून तोडगा काढू, निराकरण करू, असे अर्थ मंत्र्यांनी आधीच स्पष्ट केल्याचे गोयल यांनी सांगितले. ई-कॉमर्समुळे किरकोळ व्यापा-यांच्या व्यवसायावर परिणाम होईल, असा विचार कोणी करू नये, हे सांगताना गोयल म्हणाले, संकटाच्या काळामध्ये फक्त शेजारचा किराणा दुकानदारच मदत करू शकतो, हे तर आता सर्व सामान्यांना समजले आहे. त्यामुळे किरकोळ व्यापारी वर्गाला ‘बी-2-बी’ कार्यपद्धती सुलभतेने स्वीकारता येईल आणि त्यांच्या व्यवसायाची पोहोच जास्तीत जास्त वाढवता यावी, यासाठी तंत्रज्ञानाची जोड कशी देता येईल, तसेच त्यांची कार्यक्षमता कशी वाढवता येईल, यासाठी सरकार काम करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने परिवर्तनात्मक कार्य करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे भारत एक सशक्त राष्ट्र बनण्यासाठी मदत होईल. व्यापारी प्रतिनिधींनी इतर कर्जांविषयीही प्रश्न उपस्थित केलेत, त्याविषयी गोयल म्हणाले, मुदत कर्जाविषयी तसेच मुद्रा कर्ज आणि इतर प्रश्नांविषयी तोडगा काढण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडे विचारणा करण्यात येईल.
आता हळूहळू आर्थिक गाडी रूळावर येत असल्याचे संकेत मिळत आहेत. या महिन्यामध्ये विजेचा वापर जवळपास गेल्यावर्षीच्या या कालावधीइतकाच झाला आहे. ऑक्सिजन उत्पादन वाढले आहे. एप्रिलमध्ये निर्यातीमध्ये जवळपास 60 टक्के घट झाली होती, आता निर्यातीचा आलेख उंचावत आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार निर्यातीमध्ये झालेली घट कमी होईल. दुसरीकडे सेवा क्षेत्रातल्या निर्यातीमध्ये गेल्या महिन्यात वाढ नोंदवली आहे. व्यापारी निर्देशांकानुसार निर्यात कमी होण्यापेक्षा गेल्या महिन्यात आयातीमध्ये घट झाल्याने व्यापारी तूट कमी झाली असल्याचे स्पष्ट होत आहे, असं गोयल यांनी सांगितले.
गेल्या दोन महिन्यात सरकारने व्यापारी आणि भारतीय उत्पादकांच्या समस्या दूर करण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या आहेत. भविष्यातही आणखी उपाय योजण्यात येणार असल्याचे मंत्री गोयल यांनी सांगितले. व्यापारी वर्गाने भारतीय वस्तूंचा वापर, जाहिरात आणि समर्थन करण्याचे आवाहन केले. तसेच अशा संकटाच्या काळात सर्वांनी दृढनिश्चयाने, आत्मविश्वासाने काम करण्याचे आवाहन मंत्री गोयल यांनी केले.