
स्थैर्य, फलटण, दि. २८ ऑगस्ट : फलटण ग्रामीण पोलिसांनी दालवडी येथे एका मोठ्या कारवाईत स्विफ्ट कारमधून गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कार मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर अमली पदार्थ विरोधी कायदा आणि भारतीय शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २८ ऑगस्ट रोजी दालवडी येथील फॉरेस्ट चेकपोस्टजवळ एका कारमध्ये पिस्तूल व गांजा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, त्यांना संशयित स्विफ्ट कार आढळून आली. पोलिसांनी कारमालक रवींद्र कोलवडकर यास त्याच्या घरातून बोलावून गाडीची तपासणी करण्यास सांगितले.
मात्र, कोलवडकर याने गाडीची चावी नसल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी गाडी उघडून तपासणी केली असता, गाडीमध्ये एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि गांजा आढळून आला. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून रवींद्र कोलवडकर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, भालचीम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक श्री. सुनील महाडीक, पोलीस उपनिरीक्षक श्री. गोपाळ बडणे, वैभव सूर्यवंशी, अमोल जगदाळे, नितीन चतुर्वे, हनुमंत दडस, तात्या कदम, तानाजी डोळे, तुषार नलावडे आणि कल्पेश काशिद यांच्या पथकाने सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. बडणे करीत आहेत.