स्थैर्य, पुणे, दि. ०४ : कोरोना व्हायरस साथीच्या काळात शासनाने सर्वांना मास्क वापरणं अनिवार्य केलं आहे. मास्क न वापरल्यास नागरिकांना संबंधित प्रशासनाकडून 100 ते 500 रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येत आहे.
काही कारणांमुळे मास्क वापरणं शक्य नसल्यास नागरिकांनी रुमाल, गमछा किंवा इतर कापड वापरावं, अशी सूचना सरकारने केली आहे.
मास्कची अशी मागणी आणि आवश्यकता बघता काही फॅशन डिझाईनर्सनी आता अगदी ड्रेस किंवा सूटला मॅचिंग मास्कही देणं सुरू केलं आहे. त्याच्याही एक पाऊल पुढे गेले आहेत पिंपरी-चिंचवडचे शंकर कुऱ्हाडे.
‘पुणे तिथं काय उणे’ या म्हणीची परिणतीच देत कुऱ्हाडे यांनी चक्क सोन्याचा मास्क बनवून घेतला आहे. साडेपाच तोळ्यांच्या या मास्कची किंमत आहे 2 लाख 90 हजार रुपये.
कुऱ्हाडे यांचा हाताच्या पाचही बोटात अंगठ्या, मनगटात कडं, गळ्यात सोन्याचा गोफ आहे, ते वेगळंच. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमतीं गगना भिडलेल्या असतानाच, या प्रकाराची चांगलीच चर्चा होते आहे.
आपल्याला ही कल्पना कशी सुचली, याबाबत कुऱ्हाडे सांगतात, “कोल्हापुरात एका व्यक्तीने चांदीचा मास्क घातल्याचं टीव्हीत पाहिलं. त्यामुळे सोन्याचं मास्क बनवावा, असा विचार माझ्या मनात आला. लगेच सोनारांना याबाबत सांगून त्यांच्याकडून एका आठवड्यात हा मास्क तयार करून घेतला.”
पण आता सोन्याचा मास्क म्हटलं तर हवा खेळती राहणं शक्य नाही. यावरही कुऱ्हाडे यांनी तोडगा काढला आहे. श्वास घेणं शक्य व्हावं, म्हणून या मास्कवर छोटी-छोटी छिद्रं पाडण्यात आल्याचं ते सांगतात.
पण या मास्कमुळे कोरोना व्हायरसची लागण होईल किंवा नाही, याबाबत कुऱ्हाडे यांनी खात्रीशीर माहीत नसल्याचं सांगितलं. पण “येणारा वर्षभर तरी कोरोना कायम राहणार, अशा बातम्या येत असल्यामुळे आपण हा मास्क वापरतच राहू, असंही त्यांनी सांगितलं.”
आता सोन्याचं मास्क बनवल्यानंतर या गोष्टीची गावात तसंच सोशल मीडियावर चर्चा होणार नाही तरंच नवलच…
सोशल मीडियावर चर्चा होत असलेल्या या मास्कचं काही लोकांना नवल वाटतंय, तर काहींना हा ‘पैशाचा माज’.
ट्विटरवर विकी साळुंखे लिहितात, “असे अनेक लोक आहेत, ज्यांना जमीन किंवा इतर मालमत्ता विकून तगडा पैसा मिळालेला असतो. आणि त्यातून ते असे सोन्याचे शर्ट, मोठमोठ्या साखळ्या आणि आता हे मास्क बनवून घेतात. सारंकाही फक्त पब्लिसिटीसाठी.”
तर बालसुब्रहमण्यम लिहितात, “हा मास्क त्याला कोरोनापासून वाचवेलही, पण गुंडांपासून?”
तर गौरव अगरवाल सुचवतात, की “एकदा काय सरकारने असे सुवर्ण मास्क सर्वांना वाटले की मग लोक दिवसा काय, रात्री झोपतानासुद्धा तोंडावरचा मास्क काढणार नाही.”
आता सोनं परिधान करण्याची आवड असल्यामुळे शंकर कुऱ्हाडे यांनी मास्क बनवून तर घेतला खरा. मग व्हायरसपासून बचावाची खात्री नसेल तरी शेवटी काय? हौसेला मोल नाही, असं कुणीतरी म्हटलेलंच आहे.