स्थैर्य, सातारा, दि.१४: फलटण तालुक्यातील पिंप्रद येथे बुधवारी (दि. 10) जमिनीमध्ये झोपडी टाकल्याचा राग मनात धरून झोपडी पेटवून दिल्याने या झोपडीत झोपलेल्या महिलेचा मृत्यू झाला होता याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्यासह गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाच्या परिस्थितीवरून फिर्यादी व त्यांच्या नातेवाइकांनी या गुन्ह्याचा बनाव केला असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना त्याअनुषंगाने तपास करून गुन्ह्याची सत्यता पडताळण्याबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली. सदर पथकाने गुन्ह्याचा समांतर तपास करताना फिर्यादीमध्ये नमूद आरोपी, त्यांच्या घरातील लोक, घटना ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरातील तसेच गावातील रहिवासी, फिर्यादी व त्यांच्या घरातील इतर साक्षीदार यांच्याकडे विचारपूस केली असता सदरचा गुन्हा फिर्यादीत नमूद आरोपी यांनी केला नसल्याचे निदर्शनास आले.
सदर घटना ठिकाणच्या वादग्रस्त जमिनीच्या वहीवाटीबाबत फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये वाद होता. त्या वादातून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या उद्देशाने फिर्यादी व तिच्या घरातील लोकांनी सदर गुन्ह्याचा बनाव केला असल्याचे निदर्शनास आले. त्याप्रमाणे गुन्ह्यातील संशयित यांच्या हालचालीबाबत माहिती घेतली असता फिर्यादीची दोन मुले ही गुन्हा घडल्यापासून परागंदा असून ते पोलिसांसमोर येत नव्हते. त्यांचा गुन्ह्यातील सहभाग पाहता त्यांना सर्वप्रथम ताब्यात घेऊन विचारपूस करणे आवश्यक असल्याने अलगुडेवाडी व परिसरामध्ये त्यांचा शोध घेतला असता ते त्यांच्या राहते घरी न राहता गावाच्या आजूबाजूला असलेल्या उसाच्या शेतात राहत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे सपोनि गर्जे यांच्या अधिपत्याखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ते ज्या परिसरातील उसाच्या शेतात लपून राहिलेले आहेत त्याबाबत माहिती प्राप्त करून त्या परिसरात सापळा लावून सतत दोन दिवस थांबून राहिले असता दि. 12 फेब्रवारी 2021 रोजी सकाळी 7 च्या सुमारास सदर संशयित इसमापैकी एक जण शेजारील ऊसाचे शेतातुन बाहेर आला.
सापळा पथकातील पोलिसांनी त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांची चाहूल लागताच तो पळाला. त्याचा तपास पथकामधील पोलिसांनी उसाच्या शेतामधून, रानावनातून पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर नमूद संशयित इसमाचा भाऊ देखील त्याच परिसरामध्ये लपून बसल्याची माहिती प्राप्त झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा दोन ते तीन तास परिसरामध्ये शोध घेऊन त्यास मांगोबा माळ नावच्या परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले. नमूद दोन्ही संशयित इसमांकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, त्याच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता त्यांनी गुन्ह्यातील फिर्यादी, तिच्या घरातील तसेच जवळच्या नात्यातील लोकांनी दि. 10 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी 7.30च्या सुमारास मयत माहुली उर्फ मौली झबझब पवार हिच्या पाठीमध्ये धारदार शस्त्राने वार करून तिच्या डोक्यामध्ये दगड टाकून तिला ठार मारले व त्यानंतर तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देऊन तिचा खून केला. त्यानंतर भांडी, तांदूळ व इतर साहित्य विस्कटून स्वतःचे अंगावर जखमा करून घेऊन गुन्ह्याचा खोटा बनाव केला असल्याचे सांगितले.
याप्रकरणी कल्पना अशोक पवार (फिर्यादी), अशोक झबझब पवार (फिर्यादीचा पती व मयताचा भाऊ), ज्ञानेश्वर उर्फ कमांडो उर्फ किमाम अशोक पवार (फिर्यादीचा मुलगा), गोपी अशोक पवार (फिर्यादीचा मुलगा), विशाल अशोक पवार (फिर्यादीचा मुलगा), रोशनी रासोट्या काळे (फिर्यादीची पुतणी), काजल उर्फ नेकनूर पोपट पवार (फिर्यादीची मुलगी), मातोश्री ज्ञानेश्वर पवार (फिर्यादीची सून) (सर्व रा. अलगुडेवाडी, ता. फलटण) व इतर दोन यांना अटक करण्यात आली आहे.
गुन्ह्यातील आरोपींवर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, जबरी चोरी, गर्दी मारामारी, दुखापत या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या कारवाईत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनेप्रमाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, स.फौ. उत्तम दबडे, जोतिराम बर्गे, तानाजी माने, पो. हवा. अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, पो.ना. शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, रवी वाघमारे, नीलेश काटकर, प्रमोद सावंत, अर्जुन शिरतोडे, गणेश कापरे, अमित सपकाळ, पो. कॉ. विक्रम पिसाळ, वैभव सावंत, रोहित निकम, सचिन ससाणे, विशाल पवार, संकेत निकम, मयूर देशमुख, मोहसिन मोमीन, प्रवीण अहिरे, महेश पवार, अनिकेत जाधव, चा. पो.ना. संजय जाधव, पंकज बेसके, गणेश कचरे, विजय सावंत यांनी सहभाग घेतला.