आण्णांना आपणांतून जावून 24 वर्षे झालीत या कल्पनेवरच मुळी विश्वास बसत नाही. पण नियतीच्या खेळामुळे ही कल्पना पटत नसमली तरी मान्य करावी लागत आहे. सन 1945 साली एका शेतकरी कुटुंबात हणमंतराव पवार (अण्णा) यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण पवारवाडी येथेच झाले. आपल्या बागायती शेतीची देखभाल करीत असतानाच फलटण तालुक्याच्या राजकारणात त्यांनी सन 1973 पासून सक्रीय सहभाग घेतला. तालुक्यातील शेती आणि शेतकर्यांच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्न करण्याच्या वृत्तीमुळे सन 1976 साली फलटण तालुका दुध पुरवठा संघ मर्या; फलटण या संस्थेची स्थापना केली. फलटण तालुका खरेदी विक्री संघ या शेतकर्यांच्या उत्पादनाशी संबंधीत असलेल्या संस्थांचे ते अध्यक्ष होते. तेव्हापासून अनेक संस्थांमध्ये यशस्वीपणे काम करुन सन 1979 साली ते श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी आरुढ झाले आणि श्रीरामच्या माध्यमातून त्यांना तालुक्याच्या विकासाची फार मोठी संधी मिळाली. त्याचा पुरेपुर फायदा करुन घेऊन अण्णांनी फलटण तालुक्यामध्ये मोठ्या विकासाच्या योजना आखून त्यांची अंमलबजावणी केली. त्यांना नेहमीच विकासाचा आणि नवीन काम व संस्था उभ्या करण्याचा ध्यास लागलेला असायचा. श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक जलसिंचन योजना व बंधार्यांच्या योजना पूर्ण करुन तालुक्यातील बराचसा भाग सुजलाम सुफलाम बनविला. शिवनेरी सहकारी कुक्कूटपालन सोसायटी, दूध सागर पशुखाद्य सहकारी संघ, श्रीराम मोटार मालक सहकारी संघ लि., श्रीराम कृषी औद्योगिक ऊस तोडणी संस्था, तालुका पातळीवरील संस्था व गावोगावी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देऊन अनेक सहकारी दूध संस्था, सहकारी विकास सोसायट्या, पाणी पुरवठा सोसायट्या अशा प्रकारच्या संस्था निर्माण करुन फलटण तालुक्यामध्ये सहकाराच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली. कामगार व कार्यकर्त्यांशी सतत हसतमुख वृत्तीने त्यांचे वागणे असे.
ग्राहक चळवळ यशस्वी करणेचे दृष्टीने आणि तालुक्यातील आम जनतेला स्वच्छ निर्मळ व उच्च प्रतीच्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा किफायतशीर दराने एकाच छताखाली करुन सामान्य माणसाची मध्यस्थाकडून होणारी पिळवणूक थांबविणे आणि कृत्रिम टंचाई व भाववाढ या पासून ग्राहकांचे संरक्षण करणे या उद्देशाने श्रीराम बझार या संस्थेची स्थापना केली. श्रीराम बझार ही आदर्श ग्राहक संस्था फलटणच नव्हे तालुका, जिल्हा, राज्य व देश पातळीवर गौरवास्पद काम करणारी संस्था आहे. या आदर्श संस्थेची उभारणी व संस्थापक चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. या श्रीराम बझारचे एक भव्य डिपार्टमेंटल स्टोअर असून आज ग्रामीण भागात याच्या एकूण दहा शाखा असून तेथील ग्राहकांचा त्यांनी विश्वास संपादन केलेला आहे. कै.अण्णांनी घालून दिलेल्या तत्त्वाप्रमाणे संस्था प्रगती पथावर कार्यरत आहे, राहणार आहे.
सहकारी क्षेत्रातला त्यांचा अनुभव व अभ्यास तर दांडगा होताच त्याच बरोबर त्यांचा शेती, दूग्ध, व्यवसाय, कक्कुटपालन आदी क्षेत्रातील अभ्यास व ज्ञान खूप मोठे होते. त्यांचा लोकसंग्रह ही फार मोठी जमेची बाजू होती.
निर्भिड बाणा हा फार मोठा स्वभाव गूण त्यांच्याकडे होता. नियोजन, चिकाटी, आत्मविश्वास आणि स्वाभिमान या चतु:सूत्रीमुळे ते नेहमी यशाच्या शिखरावर असत. लोकांचे हित आणि सामाजिक विकासाच्या योजना यातच ते सतत मग्न असत. पण नियतीला त्यांचे काम पहावले नाही आणि 17 जुलै 1997 च्या रात्री काळाने या लोकप्रिय व्यक्तिमत्त्वावर झडप घालून त्यांना आपल्यातून हिरावून नेले. आण्णा आज जरी शरीराने आमच्या बरोबर नसले तरी ते मनाने व विचाराने सदैव आमच्या बरोबर आहेत. कै.हणमंतराव पवार (अण्णा) यांच्या उत्कट इच्छा व प्रेरणेने व त्यांच्या आत्मिय प्रयत्नातून श्रीराम बझार ही संस्था स्थापन झालेली आहे. त्यांच्या पवित्र स्मृती सदैव आम्हास प्रेरणा देत राहतील.
अशा महान सहकार महर्षी कै.अण्णांच्या 77 व्या जयंती निमित्त (दि.1 मार्च) त्यांना त्रिवार अभिवादन !