फलटण ते रूध्दपूर तीर्थयात्रा म्हणजे मठाधिपती आणि मठपती यांचा संगम साधण्याची किमया – प.पू. कारंजेकर बाबाजी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १० ऑगस्ट २०२३ | फलटण |
महानुभाव पंथीय आणि जैन धर्मीयांची दक्षिण काशी, फलटण ते महानुभाव पंथीयांची उत्तर काशी रुध्दपूर अशा तीर्थयात्रेमध्ये १५० स्त्री – पुरूष भाविकांना एकत्रित सहभागी करून घेत केलेले आयोजन म्हणजे मठाधिपती आणि मठपती यांचा संगम साधण्याची किमया असून भाविकांना झालेले दर्शन, सेवा पूजेचा लाभ हे अनुप शहा यांच्या धर्मप्रेम, भक्ती, श्रध्देचे अनोखे दर्शन असल्याचे श्रद्धेय प. पू. कारंजेकर बाबाजी यांनी स्पष्ट केले.

भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा व माऊली फौंडेशन आयोजित दक्षिण काशी फलटण ते उत्तर काशी रुध्दपूर अशा १५० स्त्री – पुरूष यात्रेकरूंना दक्षिण काशी श्री क्षेत्र फलटण ते उत्तरकाशी श्री क्षेत्र रुद्धपूर निघालेल्या तीर्थयात्रेचा शुभारंभ श्री चक्रपाणी मंदिर, फलटण येथे कवीश्वर कुलाचार्य प.पू. श्यामसुंदर शास्त्री विद्वांस बाबाजी, महंत प्रकाश मुनी, महंत मुकुंदराज बिडकर बाबाजी, महंत सुदामराज बाबाजी यांच्या हस्ते पूजा करून करण्यात आला.

अनुप शहा यांनी आतापर्यंत जैन, महानुभाव तीर्थयात्रेचे अनोख्या पद्धतीने आयोजन करून भाविकांना दर्शन घडविताना समाजातील श्रद्धावान असूनही आर्थिक परिस्थिती किंवा शारिरीक अपंगत्व यामुळे इच्छा असूनही तीर्थयात्रा करू शकत नाहीत अशांना मोफत तीर्थयात्रा घडवून वेगळा उपक्रम राबविला आहे. अन्य राजकीय पक्ष, संघटना, नेते मंडळींनी याप्रमाणे यात्रा नियोजन करून विविध समाज घटकांना तीर्थयात्रा घडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा श्रद्धेय प. पू. कारंजेकर बाबाजी यांनी व्यक्त केली आहे.

या सर्व यात्रेकरूंना तीन एस.टी. बसद्वारे दौंडपर्यंतचा प्रवास केल्यानंतर दौंड रेल्वे स्टेशन येथे सकल जैन समाज व भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने स्वप्निल शहा व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सर्व यात्रेकरूंचे स्वागत करून यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या.

रूद्धपूर येथे महंत श्री यक्षदेव बाबाजी, राहुल मुनी शिवनेकर यांनी संपूर्ण गावामध्ये रांगोळी काढून यात्रेकरूंना पुष्पगुच्छ – पुष्पहार देऊन बँड लावून संपूर्ण गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढून यथोचित स्वागत केले. त्यानंतर सलग ३ दिवस सर्व स्त्री – पुरूष यात्रेकरूंनी या तीर्थक्षेत्री असलेल्या सुमारे ३५० मंदिरातील स्थानांचे दर्शन घेतले. दि. ५ ऑगस्ट रोजी रुद्धपूर येथील प्रमुख मंदिर राजमठ येथे सहस्र दीपक आरती सोहळा संपन्न केला.

दि. ६ ऑगस्ट रोजी महंत श्री कारंजकर बाबाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत व अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे माजी अध्यक्ष गोपीराज बाबाजी यांच्या अध्यक्षतेखाली समारोप सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यात्रा यशस्वी करण्यासाठी सेवासमर्पण ग्रुपचे सर्व साधू मंडळी हरिदास शास्त्री विद्वांस, भरत दादा विद्वांस, महेंद्रमुनी बिडकर, भरतदादा जामोदेकर, श्रीनिवास विद्वांस, अक्षय विध्वंस, अखिल भारतीय महानुभाव भोपे पुजारी, महासंघाचे अजित मठपती, दिलीप मठपती, रमेश मठपती, अक्षय भोसले, पितांबर भोसले, विशाल गणदास, दत्तराज खेडेकर यांच्यासह सर्वांनीच परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!