दैनिक स्थैर्य । दि.११ एप्रिल २०२२ । सातारा । महात्मा जोतीराव फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना देव बनवून त्यांचे भक्त होण्याऐवजी त्यांच्या विचाराचे पाईक व्हावे असे आवाहन इतिहासाचे अभ्यासक प्रा डॉ भास्कर कदम यांनी आज म. जोतीराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती च्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले. – शिवाजी विद्यापीठ दुरस्थ शिक्षण केंद्राच्या सातारा जिल्हा केंद्रामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रा डॉ भास्कर कदम बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार दिनकर झिंब्रे होते. आजच्या काळातही सनातन प्रवृत्ती त्या वेळेप्रमाणेच डोके वर काढू लागल्या आहेत. त्या प्रवृत्तींना फुले-शाहू- आंबेडकरांच्याच विचारानेच उत्तर देणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादनही प्रा. डॉ. भास्कर कदम यांनी केले. महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर हे बोलघेवडे विचारवंत नव्हते तर ते कर्ते विचारवंत व समाजक्रांतीकारक होते असे प्रतिपादन सातारा येथील छ शिवाजी महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा डॉ शिवाजीराव पाटील यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते विजय मांडके यांनी महात्मा फुले यांचे अखंड म्हटले. दुरस्थ शिक्षण केंद्राचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. सुर्यकांत गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जेष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ , प्रा. डॉ निलकंठ लोखंडे , प्रा. विकास एलमार , प्रा. प्रक्षाळे , प्रा. कबीर बनसोडे इत्यादी उपस्थित होते.