
दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑगस्ट २०२३ | बारामती |
गौरी डिजिटल फोटो लॅब यांच्या वतीने शनिवार, १९ ऑगस्ट रोजी बारामती तालुक्यातील फोटोग्राफर यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी लग्नसमारंभ, राजकीय, नैसर्गिक, चित्रपट आदी क्षेत्रातील फोटोग्राफर उपस्थित होते.
फ़ोटोग्राफी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, नवीन समस्या व त्यावरील उपाययोजना, अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज व आधुनिक कॅमरे चालवण्यासाठी प्रशिक्षण घेण्याची गरज, याविषयी चर्चा व त्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्याचे नियोजन आदी विषयांवर विचारविनिमय करण्यात आला.
कोरोनाकाळात मृत्युमुखी पडलेले ज्येष्ठ फोटोग्राफर कै. बबनराव सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन करून वृक्षारोपणाचा संदेश सर्व दूर जावा व प्रत्येकाने घरासमोर, शेतात, अपार्टमेंटमध्ये वृक्षारोपण करावे, या उद्देशाने प्रत्येक फोटोग्राफरला गुलाब, मोगरा, जास्वंद, जुई व इतर रोपटे देऊन सन्मान करण्यात आला व केक कापून छायाचित्र दिन साजरा करण्यात आला.
क्षणाक्षणाला बदलत्या काळात फोटोग्राफी क्षेत्रातील आव्हाने बदलत आहेत. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान स्वीकारताना ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करताना सर्वांनी विचारांची देवाण घेवाण करणे गरजेचे असून धावपळीच्या युगात स्वतःचे आरोग्य जपत ग्राहकांना सेवा द्या, असा सल्ला गौरी डिजिटल लॅबचे संचालक सचिन सावंत यांनी दिला.
विविध क्षेत्रातील फोटोग्राफर यांनी मनोगत व्यक्त केले. आभार निखिल काळे यांनी मानले.