स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 17 : भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या हिंसक झडप आणि सीमा वाद यावर चर्चा केली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात चर्चा झाली आहे. दोन्ही देशांनी सीमेवरील तणावाची सध्याची स्थिती कमी करण्यावर एकमत दर्शवले आहे.
दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या चर्चेनंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली, की दोन्ही देशांनी भारत-चीन सीमेवरील तणाव कमी करण्यावर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांच्या शिखर चर्चेत ज्या बाबी एकमताने ठरल्या आहेत, त्याचा दोन्ही देशांनी आदर करावा, असे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यांनी जयशंकर यांना सांगितले. सध्या अस्तित्वात असलेल्या मार्गानेच दोन्ही देशांनी परस्पर संवाद वाढवावा, असेही वांग यांनी सांगितले.
पराराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी या चर्चेदरम्यान म्हटले, की गलवान व्हॅलीमध्ये जे काही झाले, तो पूर्वनियोजित आणि रणनीती आखून झालेले आहे. भविष्यात जे काही घडेल त्याला चीनच जबाबदार असेल.