
दैनिक स्थैर्य । दि. ०७ जुलै २०२२ । फलटण । नॉर्थरडॅम येथे खुल्या गटात पार पडलेल्या लॉन टेनिस स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील फलटणच्या विश्वजीत सांगळे याने विजेतेपद पटकावले आहे.
बेनॉइट एच या फ्रान्सच्या खेळाडूचा 6-2, 7-5 अशा सरळसेटमध्ये पराभव करून विश्वजीतने विजेतेपद खेचून आणले आहे.
विश्वजीतचे हे सलग तिसरे विजेतेपद आहे. यापूर्वी क्रमाने ओसाका (जपान), बर्लिन (जर्मनी ) या ठिकाणी ही उत्तम खेळाचे प्रदर्शन करीत विश्वजीतने विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे.
स्पर्धेत टीकायचे असेल तर खेळाचा सराव, नियोजनबद्ध व्यायाम, योग्य तो संतुलित आहार महत्वाचा आहेच. पण त्याबरोबर आर्थिक नियोजनासाठी खुप प्रयत्न करावे लागत असून ऑलिम्पिकच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे विश्वजीतने यावेळी स्पष्ट केले.
विश्वजीत मुळचा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील रहिवाशी आहे. शिक्षण व खेळाचे योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी काही वर्षापासून मुंबईत वास्तव्यास आहे.
खेळातील उत्तम परफॉर्मन्स दाखवून ही खेळाडूला आर्थिक मदतीसाठी वणवण करावी लागते हे खरच खुप त्रासदायक असते, अशी भावना विश्वजीतची आई श्रद्धा सांगळे यांनी व्यक्त करून खेळातील सातत्य ठेवण्यासाठी आर्थिक हातभार मिळणे महत्वाचे असल्याचे सांगितले.