स्वराज ग्रीन पॉवर, फलटणला राष्ट्रीय स्तरावरील ‘इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड २०२५’ प्रदान


स्थैर्य, फलटण, दि. २६ सप्टेंबर : फलटण तालुक्यातील स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युअल लिमिटेड या कंपनीला भारत सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा “इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड २०२५” जाहीर झाला आहे. “पर्यावरण संरक्षण व उच्च दर्जाची उत्पादन कार्यक्षमता साध्य करण्यासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञान अवलंबणारा शुगर इथेनॉल उत्पादक” या विशेष श्रेणीत हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

आज नवी दिल्ली येथे झालेल्या एका शानदार सोहळ्यात, कंपनीचे संस्थापक व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नवीकरणीय ऊर्जा आणि इथेनॉल उत्पादन क्षेत्रासाठी हा एक ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.

स्वराज ग्रीन पॉवर कंपनीने साखर कारखान्याशी संलग्न डिस्टिलरी प्रकल्पाद्वारे इथेनॉल उत्पादनात अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. कमी ऊर्जेत जास्त उत्पादन, सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया आणि ‘नेट झिरो कार्बन एमिशन’चे ध्येय साध्य करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल या पुरस्काराद्वारे घेण्यात आली आहे.

कंपनीच्या या यशात संस्थापक रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या दूरदृष्टीसोबतच, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र देशपांडे आणि महाव्यवस्थापक (डिस्टिलरी) संजय पवार यांच्या नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. तसेच, ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर या कारखान्याच्या कामकाजात सक्रिय असून, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या विशेष प्रयत्नशील असतात.

हा सन्मान केवळ कंपनीचा नसून, फलटण तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांचा गौरव आहे. “हरित ऊर्जा, शाश्वत विकास आणि शेतकरी हित” हे ध्येय ठेवून कंपनी भविष्यातही कार्यरत राहील, असे व्यवस्थापनाने म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!